पाकिस्तानात सगळ्यात सुंदर अजीखेली म्हशीचा शोध घेण्यासाठी झालेल्या स्पर्धेत जवळपास २०० म्हशींचा सहभाग होता. ‘द डॉन’ने दिलेल्या बातमीनुसार पाकिस्तानच्या उत्तरेकडील स्वातचे मुख्यालय असलेल्या मिनगोरामध्ये तीन दिवस चाललेल्या या उत्सवात शेतकरी आणि म्हशींचे पालक एकत्र जमले होते. हा उत्सव म्हशींच्या जातींना प्रोत्साहन देण्यासाठीही आयोजित केला जातो. या कार्यक्रमाला अमेरिकेच्या सरकारकडून मदत मिळाली आहे. विजेत्या म्हशीला ७५ हजार रुपयांचे बक्षीस दिले गेले. या बक्षीसाचा मानकरी लईक बदर हा शेतकरी ठरला. तो म्हणाला की, ‘माझ्याकडे या प्रजातीच्या दहा म्हशी असून, त्यांच्यावरच माझा उदरनिर्वाह चालतो. माझी म्हैस विजेती ठरल्याचा मला अभिमान आहे.’ पाकिस्तानात म्हशींची सौंदर्य स्पर्धा प्रथमच झाली.अजीखेली म्हशीची जात नष्ट होण्याच्या काठावर आहे. त्यामुळे लोकांमध्ये या जातीच्या म्हशीबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उत्सव आयोजित केला होता, असे पाकिस्तानचे पशुधन मंत्रालयाचे अधिकारी मुहिबुल्लाह खान यांनी सांगितले. अजीखेली म्हैस फक्त स्वात क्षेत्रातच सापडते. या क्षेत्राच्या थंड वातावरणात राहण्यास ही प्रजाती अनुकूल आहे. याचा अर्थ असा की, जेव्हा या क्षेत्रात थंडी पडते त्यावेळी म्हैस पालनकर्त्यांना आपले हे धन विकायची वेळ येत नाही. अजीखेली म्हैस दिसायलाच फक्त सुंदर आहे, असे नाही तर ती दूधही खूप देते. तिचे मांसही रुचकर असते.
पाकिस्तानात झाली म्हशीसाठी सौंदर्य स्पर्धा
By admin | Published: April 28, 2017 1:54 AM