नैरोबी : पदवी नसताना डॉक्टर म्हणून काम करणारा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आपण बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर पाहिला, पण त्याचा एक अवतार केनियात निघाला. वकिलीची डिग्री नसताना तब्बल २६ खटले जिंकणाऱ्या ‘मुन्नाभाई एलएलबी’ला केनियात अटक झाल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
केनियाच्या उच्च न्यायालयाचे वकील म्हणून मिरवणाऱ्या ब्रायन मवेंडा या बनावट वकिलाने न्यायदंडाधिकाऱ्यापासून उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर ही सर्व प्रकरणे हाताळली.
ब्रायनने वकील असल्याचा असा बनाव केला की, कोणालाही शंका आली नाही. विशेष म्हणजे अटक होईपर्यंत न्यायाधीशांनीही त्याच्यावर शंका घेतली नाही. विधी सोसायटीच्या तक्रारीवरून त्यास अटक केली.
अशी केली फसवाफसवी...ब्रायनने केनियाच्या विधि सोसायटीच्या पोर्टलवर गुन्हेगारी पद्धतीने प्रवेश मिळवला आणि त्याच्याशी संबंधित नावाचे खाते उघडले. नंतर तपशिलांशी छेडछाड केली आणि केनियाच्या कायदेशीर व्यवसायात घुसखोरी करण्यासाठी स्वतःचा फोटो अपलोड केला. यासाठी त्याने त्याच्या नावाशी साधर्म्य असलेल्या ब्रायन मवेंडा एनट्विगा या वकिलाचा डाटा चोरला.