लंडन : खाण्यापिण्याच्या सवयींतील बदल आणि वाढलेल्या उंचीमुळे सरासरी व्यक्तीला भविष्यात जास्त अन्नाची गरज असेल, असे नव्या संशोधनात म्हटले आहे. सध्या जगाची लोकसंख्या ७.६ अब्ज असून काही वर्षांत ही नऊ अब्ज असेल. नऊ अब्ज लोकांना आजच्या तुलनेत २०५० मध्ये अन्न पुरवणे जास्त कठीण असेल, असे नॉर्वेजियन युनिव्हर्सिटी आॅफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे संशोधक जिब्रॅन विटा यांनी म्हटले.
संशोधकांनी १९७५ आणि २०१४ दरम्यान १८६ देशांतील लोकसंख्येतील बदलांचे विश्लेषण केले. आम्ही दोन गोष्टींच्या परिणामांचा अभ्यास केला. एक म्हणजे सरासरी लोक उंच आणि वजनदार झाले आहेत आणि दुसरे म्हणजे सरासरी लोकसंख्या म्हातारी होत आहे, असे विटा म्हणाले. जगातच मानवी उपभोग या कालावधीत (१९७५ ते २०१४) १२९ टक्क्यांनी वाढला. त्यातील ११६ टक्के वाढीला लोकसंख्या जबाबदार आहे तर वाढलेली उंची आणि वजनाचा त्यातील वाटा १५ टक्के आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी भविष्यात अन्नाचा विचार करताना वयोवृद्धांच्या गरजा याआधीच्या अभ्यासकांनी विचारात घेतल्या नव्हत्या, असे फेलीप वॅक्वीझ यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)उंची, वजन आणि कॅलरीच्२०१४ मध्ये सरासरी प्रौढ व्यक्ती १४ टक्के वजनदार, १.३ टक्के उंच, ६.२ टक्के वय वाढलेली आणि १९७५ च्या तुलनेत ६.१ टक्के जास्त ऊर्जा गरजेची असलेली होती. संशोधकांना हाच कल पुष्कळ देशांत कायम राहण्याची अपेक्षा आहे. सरासरी जागतिक प्रौढ व्यक्ती १९७५ मध्ये २,४६५ किलो कॅलरीज खायचा. २०१४ मध्ये सरासरी प्रौढ व्यक्ती २,६१५ किलो कॅलरी खायचा, असे विटा म्हणाले.