ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 25 - प्रसिद्ध बॉक्सर मोहम्मद अली यांचा मुलगा मोहम्मद अली ज्यूनियर यांना फ्लोरिडाच्या विमानतळावर इमिग्रेशन अधिका-यांनी काही तासांसाठी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.
हा सर्व प्रकार धर्मभेदी वागणुकीतून घडल्याची माहिती समोर येत आहे.
अली यांच्या कुटुंबीयांना दिलेल्या माहितीनुसार, अधिका-यांकडून त्यांना पुन्हा पुन्हा त्यांचे नाव विचारण्यात येते होते. हे नाव कसे मिळाले? मुस्लिम आहेस का? असे प्रश्न वारंवार विचारुन त्यांना भंडावून सोडण्यात आले. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या नव्या आदेशानंतर अमेरिकेच्या विमानतळावर सर्व प्रवाशांची कडक चौकशी केली जात आहे. अली यांची चौकशीही त्या आदेशांर्तगतच झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, ही घटना 7 फेब्रुवारी रोजी घडली आहे. मोहम्मद अली ज्यूनियर आणि त्यांची आई खालिआ केमेको अली जमैकातील एका कार्यक्रमात सहभागी होऊन पोर्ट लॉडरडेल-हॉलिवूड आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले होते. त्यांच्या नावामुळे इमिग्रेशन ऑफिसरने त्यांची वारंवार चौकशी केली. चौकशीच्या काही वेळानंतर त्यांनी खालिआ केमेको अली यांना सोडून दिले.
यावेळी खालिआ यांनी मोहम्मद अलीसोबतचा आपला फोटा दाखवला होता. मात्र, मुलाला दोन तास बसवून ठेवण्यात आले, कारण अलीसोबत त्यांचा फोटो नव्हता. दरम्यान, फ्लोरिडा विमानतळावर मिळालेल्या वागणुकीविरोधात मोहम्मद अली ज्युनिअर कायदेशीर तक्रार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.