वॉशिंग्टन : सिरियात वर्षभरापासून बंदी असलेले अमेरिकेचे पत्रकार स्टीव्हन सॉटलोफ्ट यांची इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. या हत्येचा व्हिडिओ इस्लामिक स्टेटने मंगळवारी जारी केला असून त्यात स्टीव्हन यांचा शिरच्छेद करण्यात आल्याचे दिसते.
सॉटलोफ्ट हे सिरियात गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बेपत्ता झाले होते. आणखी एक अमेरिकन पत्रकार जेम्स फॉले यांचा इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी शिरच्छेद केल्याचा व्हिडिओ गेल्या महिन्यात जारी झाला होता.
त्या व्हिडिओत स्टीव्हन सॉटलोफ्ट शेवटचे दिसले होते. फॉले यांच्या हत्येनंतर सॉटलोफ्ट यांच्या आईने इस्लामिक स्टेटचे नेते अबू बकर अल बगदादी यांना माङया मुलाचे प्राण वाचवा अशी विनंती केली होती. सॉटलोफ्ट यांच्या हत्येच्या वृत्ताची खातरजमा करीत आहोत, असे व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जोश अर्नेस्ट यांनी म्हटले. तसा काही व्हिडिओ जारी झाला असेल तर अमेरिकन सरकार त्याची खूप काळजीपूर्वक खातरजमा करून घेईल व आमचे गुप्तचर त्या व्हिडिओची अधिकृतता तपासून घेतील, असे अर्नेस्ट म्हणाले.
अमेरिकेने नुकतेच इराकमधील इस्लामिक स्टेटच्या ठिकाणांवर किमान 12 हवाई हल्ले केले होते. (वृत्तसंस्था)