बीजिंग : भारतात काही संघटना थेट आणि सोशल मीडियावरून चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा जोरदार प्रचार करीत असून, त्यामुळे काही व्यापारी आणि ग्राहकांनी त्यावर बहिष्कारही घातला आहे. त्याचा चिनी वस्तुंच्या बाजारपेठेवर फार मोठा परिणाम झाला नसला तरी या प्रकाराची दखल घेत, भारताने आमच्या वस्तुंवर बहिष्कार घातल्यास दोन्ही देशांतील संबंध बिघडतील, असा इशारा चीनने दिला आहे.चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घातल्यास भारतामध्ये चीनकडून होत असलेल्या गुंतवणुकीवर त्याचा नकारात्मक परिणाम होईल. ते टाळण्यासाठी दोन्ही देशांत सहकार्य गरजेचे आहे. मात्र दोन्ही देशांतील लोकांकडून तसा समजुतदारपणा पाहायला मिळत नाही आहे, असे चीनचे भारतातील दुतावास शी लियान म्हणाले. दक्षिण आशियात भारत हा चीनचा सर्वात मोठा भागीदार आहे. तसेच जगातील वस्तू निर्यात करणारा सर्वात मोठा नववा देश आहे. भारतातील अनेक व्यापाऱ्यांनी चीनमध्ये बनवलेल्या फटाक्यांसह अनेक वस्तुंवर बहिष्कार टाकला आहे. पाकिस्तानला चीन मदत करीत असल्याच्या आरोपामुळे त्यात भर पडली आहे. चीन-पाकिस्तान यांच्यातील जवळिकीमुळेच भारतात चिनी वस्तूंबाबत नकारात्मक प्रचार होतो आहे. मात्र हा बहिष्काराला कोणताही कायदेशीर आधार नाही. दिवाळीशी संबंधित वस्तुंवरच बहिष्कार मर्यादित नसून, अन्य वस्तुंच्या खरेदीवरही परिणाम होत असल्याचे असे शी लियान यांनी बोलून दाखवले.भारत व चीनमध्ये २0१५ साली द्विपक्षीय व्यापार ७१.६ अब्ज डॉलरच्या घरात होता. तो आता 50 अब्ज डॉलर इतका खाली आला आहे. चीन फक्त भारतात २ टक्केच निर्यात करत असल्याचेही शी लियान यांनी सांगितले.आयात थांबवायला हवीलोकांनी त्यावर बहिष्कार घालावा, असे आवाहन काही संघटना व राजकीय पक्ष करताना दिसतात. पण जोपर्यंत त्यांच्या आयातीवर बंदी येत नाही, तोपर्यंत बहिष्काराने प्रश्न सुटणार नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. एकीकडे चायनीज वस्तुंवर बंदी घातली तरच त्याला काही अर्थ आहे, असे व्यापाऱ्यांनी बोलून दाखवले.स्वस्त आणि मस्त : दिवाळीच्या काळात विविध प्रकारच्या फटाक्यांपासून पणत्या, आकाश कंदील, दिव्यांच्या माळा भारतीय बाजारात येतात. भारतीय वस्तुंच्या तुलनेत या चिनी वस्तू खूपच स्वस्त असल्याने त्या घेण्याकडे ग्राहकांचा ओढा असतो. काही चिनी फटाक्यांवर भारतात १९९२ सालपासून बंदी असूनही, त्यांचे स्मगलिंग होत असल्याचेही आढळून आले आहे. गणेशोत्सवाच्या काळातही आरास व सजावट करण्यासाठी लागणाऱ्या वस्तुंपासून गणेशमूर्तीपर्यंत सारेच चायनीज येत असल्याचे दिसत आहे.
चिनी वस्तुंवरील बहिष्कारामुळे बीजिंग संतप्त
By admin | Published: October 30, 2016 2:19 AM