मॉस्को : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीनंतर बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेंको यांची प्रकृती खालावली असून त्यांना मॉस्कोतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. बेलारूसचे विरोधी पक्षनेते व्हॅलेरी त्सेपल्को यांनी ही माहिती दिली. पुतिन यांची भेट घेतल्यानंतर लुकाशेंको यांना मॉस्कोमधील सेंट्रल क्लिनिकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. बेलारूसचे राष्ट्रपती लुकाशेंको हे पुतिन यांच्या जवळचे नेते मानले जातात. ते युक्रेनवरील हल्ल्याचे समर्थन करत होते.
त्सेपल्को यांनी शनिवारी एक ट्विट करत म्हटले आहे, "प्राथमिक माहितीनुसार, पुतिन यांच्यासोबत बंद दराआड झालेल्या भेटीनंतर लुकाशेंको यांना तत्काळ मॉस्कोतील क्लिनिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते सध्या वैद्यकीय देखरेखीखाली असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांचे 'रक्त शुद्ध' केले जात आहे. त्यांची प्रकृती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासारखी नाही."
लुकाशेंको यांना देण्यात आलं विष? -व्हॅलेरी म्हणाले, लुकाशेंको यांना क्रेमलिनने विष दिल्याचा संशय आहे. एवढेच नाही, तर कुणालाही संशय येऊ नये म्हणून, बेलारूसच्या हुकूमशाहला वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. केल्या काही दिवसांपासून लुकाशेंको यांच्या प्रकृतीसंदर्भात अफवा उठत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाही लुकाशेंको मॉस्कोमधील विक्ट्री डे परेडनंतर, रशियातून निघून गेले होते. त्यांनी पुतिन यांच्यासोबत दुपारचे जेवणही घेतले नव्हते.
'मी मरणार नाही' -काही माध्यमांतून दावा करण्यात आला आहे की, लुकाशेंको अत्यंत थकल्यासारखे दिसत होते आणि त्याच्या उजव्या हातावर बँडेज लावलेले होती. यानंतर त्यांनी, मित्रांनो मी मरणार नाही, पुढे बरेच दिवस तुम्हाला माझ्यासोबत संघर्ष करावा लागेल, असे म्हणत, अफवा फेटाळून लावल्या होत्या.