रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन शुक्रवारी 7 ऑक्टोबर रोजी 70 वर्षांचे झाले. आपल्या आयुष्यातील सर्वात कठीन काळाचा सामना करत असलेल्या पुतिन यांच्यासाठी संपूर्ण देशात प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आलेले आहे. देश आणि जगातील अनेक नेते त्यांना शुभेच्छा देत आहेत. यातच आता बेलारूसने पुतिन यांना ट्रॅक्टर गिफ्ट केले आहे. महत्वाचे म्हणजे, एकेकाळी बेलारूसही सोव्हियत संघाचाच एक भाग होता. या देशांसाठी ट्रॅक्टरचे विशेष महत्व आहे.
यामुळेच, राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना त्यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी गिफ्ट म्हणून एक ट्रॅक्टर दिले आहे. पूर्वीच्या सोव्हियत संघात असलेल्या अनेक देशांच्या नेत्यांनी सेंट पीटर्सबर्गचा कॉन्स्टँटिन पॅलेसमध्ये भेट घेतली आणि बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी पुतिन यांना वाहनाचे प्रमाणपत्र गिफ्टम्हणून दिले. ट्रॅक्टर हे सोव्हियत काळापासूनच बेलारूसचा औद्योगिक गौरव आहे.
बेलारूसमध्ये जवळपास तीन दशकांपासून कठोरपणे शासन करणारे लुकाशेंको पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले. की, आपण आपल्या बागेत ट्रॅक्टरचे जे मॉडेल वापरतो त्याच प्रकारचे मॉडेल आपण पुतिन यांना गिफ्ट स्वरुपात दिले आहे. मात्र, पुतिन यांनी, राष्ट्रपती लुकाशेन्को यांनी दिलेल्या गिफ्टवर कशा पद्धतीने प्रतिक्रिया दिली हे अद्याप समजू शकलेले नाही.