इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या 72 तासांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत 900 इस्रायली लोक मारले गेले आहेत. 2,600 हून अधिक जखमी झाले आहेत. त्याचवेळी गाझा पट्टीमध्ये 704 जणांना आपला जीव गमवावा लागला असून सुमारे 4000 लोक जखमी झाले आहेत. गाझामध्ये ठार झालेल्यांमध्ये 143 मुलं आणि 105 महिलांचा समावेश आहे. एवढेच नाही तर लेबनानमध्येही त्याचा प्रभाव दिसून येत आहे.
एकीकडे वेस्ट बँकमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला असून 2,616 लोक जखमी झाले आहेत, तर दुसरीकडे लेबनानमध्ये 3 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकूण, आतापर्यंत दोन्ही बाजूंचे सुमारे 1600 लोक मारले गेले आहेत आणि 6 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. सतत होणारे स्फोट, हवाई हल्ले आणि बॉम्बस्फोटांमध्ये लोकांच्या किंचाळण्याचे आवाज समोर येऊ लागले आहे.
इस्रायल किंवा हमास यापैकी कोणीही झुकायला तयार नाही. हमासने इस्रायलला धमकी दिली आहे की, जर आपण बॉम्बफेक थांबवली नाही तर एक एक करून इस्रायलमधून अपहरण केलेल्या लोकांना मारण्यास सुरुवात करू, तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही मागे हटण्यास नकार दिला आहे. हमासच्या कारवाईनंतर मागे हटण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे नेतान्याहू यांनी म्हटले आहे.
नेतन्याहू यांनी एक निवेदन जारी करून पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासला कडक इशारा दिला आहे. भविष्यात आपण जी पावलं उचलणार आहोत त्याचा थेट परिणाम आपल्या भावी पिढ्यांवर होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नेतान्याहू पुढे म्हणाले, "हमासने युद्ध सुरू केले आहे आणि आता त्याला तोंड देण्यासाठी सज्ज असले पाहिजे. आमच्या भागात अजूनही मोठ्या प्रमाणात दहशतवादी आहेत. त्यांना दूर करण्यासाठी आम्ही पावले उचलत आहोत."
"आम्ही लेबनान आणि वेस्ट बँकसह आमच्या सीमा मजबूत करण्यासाठी काम करत राहू. आम्हाला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवायचा आहे जेणेकरून आम्ही स्वतंत्रपणे पुढे जाऊ शकू." बेंजामिन नेतन्याहू यांनी अभूतपूर्व आंतरराष्ट्रीय पाठिंब्याबद्दल आभार मानले. इस्रायलमधून अपहरण झालेल्या आणि बेपत्ता झालेल्या लोकांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी आपण कठीण काळातून जात आहोत. मात्र विजय आमचाच होणार असा विश्वास आहे. हमास हे ISIS (इस्लामिक स्टेट) चे दुसरे रूप आहे. आम्ही ISIS प्रमाणेच याचाही अंत करू असं नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.