लंडन: बेन्सन अँड हेजेस या जगप्रसिद्ध सिगारेटची निर्मिती करणाऱ्या ब्रिटिश अमेरिकन टोबॅको (बॅट) कंपनीनं कोरोनाची लस शोधल्याचा दावा केला आहे. तंबाखूपासून कोरोनाच्या लसीची निर्मिती केल्याचा दावा बॅटनं केला आहे. ब्रिटिश सरकारनं सहकार्य केल्यास जूनपासून ३ मिलियन लसींचं उत्पादन करू, असं बॅटनं म्हटलं आहे. बॅटनं तयार केलेल्या लसींची सध्या प्राण्यांवर चाचणी घेतली जात आहे. यानंतर लगेचच माणसांवर लसीचा प्रयोग केला जाऊ शकतो. कोरोनाशी लढा देण्यासाठी, लसीचं उत्पादन करण्यासाठी ६५.५ बिलियन पाऊंड्स खर्च करण्याची तयारी बॅटनं केली आहे. मोठ्या प्रमाणात लसींची निर्मिती करण्यासाठी ब्रिटन सरकारनं सहकार्य करावं, अशी इच्छा कंपनीनं व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांनुसार तंबाखू क्षेत्रातल्या कोणत्याही कंपनीला सरकारशी करार करता येत नाही. मात्र आपण या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेशी संपर्क साधू, असं बॅटनं म्हटलं आहे. कोरोना लसीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी कंपनीनं अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाशी आणि ब्रिटनच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला आहे. सरकारच्या सहकार्यानं या महिन्यापासून लसींवर अधिक संशोधन सुरू करता येईल, अशी आशा बॅटला आहे. 'चाचणी यशस्वी ठरल्यास जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर लसींची निर्मिती केली जाऊ शकेल. चांगला भागीदार आणि सरकारी विभागांची मदत मिळाल्यास जूनपासून दर आठवड्याला १ ते ३ मिलियन लसींची निर्मिती करता येईल,' असं बॅटनं प्रसिद्धीपत्रात म्हटलं आहे.बॅटची उपकंपनी असलेल्या केंटुकी बायोप्रोसेसिंगनं (केबीपी) कोरोनावरील लसीची निर्मिती केली आहे. तंबाखू कारखान्यात वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं लस तयार करण्यात आल्याचं बॅटनं म्हटलं आहे. २०१४ मध्ये इबोलाची साथ पसरली होती. त्यावेळीही बॅटनं औषध तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
Coronavirus: तंबाखूपासून कोरोनाची लस तयार; जगप्रसिद्ध सिगारेट कंपनीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 2:25 PM