रोम: एकेकाळी भूमध्य समुद्र, त्याच्या आसपासची बेटे, किनारे आणि प्रदेश स्वर्गासमान मानला जाई. दुधामधाचा प्रदेश म्हणून ओळखला गेल्यामुळे आणि आॅलिव्ह तेलांमुळे व्यापाऱ्यांचाही हा आवडीचा मार्ग होता. मात्र आता याउलट स्थिती झालेली दिसून येते. चांगल्या राहणीमानासाठी (खरे तर जिवंत राहण्यासाठी) आफ्रिकेतील नागरिक देश सोडून गेल्या दोन वर्षांत युरोपमध्ये घुसत आहेत. मात्र लिबिया ते इटली या भूमध्य समुद्रातील प्रवासात आजवर हजारो विस्थापितांचा बोट बुडून मृत्यू झाला आहे.जगभरामध्ये स्थलांतरितांच्या या प्रवाहांची स्थिती पाहता दुसऱ्या महायुद्धापेक्षाही वाईट स्थिती आता निर्माण झाली आहे असे अभ्यासक सांगत आहेत. लिबियामार्गे इटलीमध्ये घुसून नंतर संपूर्ण युरोपात स्थायिक होण्याच्या स्थलांतरितांच्या या मार्गात जागोजागी मृत्यूने अडथळे निर्माण केले आहेत. लाकडी बोटींच्या साहाय्याने नागरिकांची चक्क तस्करी केली जाते. आजवर या बोटी फुटण्याच्या, बोट बुडण्याच्या किंवा डेकखाली घुसमटून मरण्याच्या असंख्य घटना घडल्या आहेत. तरीदेखील ही तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन फॉर मायग्रेशनच्या आकडेवारीनुसार भूमध्य समुद्रातून युरोपात येणाऱ्या स्थलांतरितांची संख्या अडीच लाखावर पोहोचली आहे, तर या उन्हाळ््यामध्ये ग्रीस व इटलीमध्ये दररोज १००० अशा प्रमाणामध्ये स्थलांतरित येऊल पोहोचले आहेत. या आॅगस्ट महिन्यातच तीन मोठ्या घटनांमध्ये अनेक विस्थापितांना प्राण गमवावे लागले. ५ आॅगस्ट रोजी २०० लोकांना घेऊन जाणारी बोट बुडाली, त्यामध्ये मृत पावलेल्यांची संख्या अद्याप समजलेली नाही तर ११ आॅगस्ट रोजी ६० लोक बुडून मरण पावले. १५ आॅगस्ट रोजी डेकखाली बसलेल्या लोकांपैकी ४० लोकांचा घुसमटून मृत्यू झाला. या वर्षभरामध्ये २००० हून अधिक लोकांचा प्राण भूमध्य समुद्रामध्ये झालेला आहे.आफ्रिकेतून युरोपात शिरण्यासाठी सिसिलीच्या सामुद्रधुनीचा वापर केला जातो. पूर्व आणि पश्चिम भूमध्य समुद्राला एकमेकांपासून अलग करणाऱ्या या सामुद्रधुनीची लांबी १४५ कि.मी. आहे.ट्युनिशिया व सिसिली यांच्यामध्ये हा सागरी पट्टा असून ३१६ मी. इतकी तिची खोली आहे. बहुतांश अपघाताच्या घटना येथे घडलेल्या आहेत. त्यातूनही मार्ग काढत स्थलांतरित सिसिलीमध्ये पोहोचतात.इटली पेचामध्ये : या सर्व स्थलांतरितांचा पहिला परिणाम इटलीवर होतो. इटली सरकारने यावर्षी जानेवारी ते जुलै या कालावधीत जाहीर केलेल्या स्थलांतरितांच्या आकडेवारीनुसार ९३,५४० लोक इटलीमध्ये पोहोचले आहेत. २०१४ मध्ये याच काळात ८७,९१५ स्थलांतरित इटलीमध्ये आले होते.
भूमध्य समुद्राचा 'बर्म्युडा ट्रँगल'
By admin | Published: August 16, 2015 10:23 PM