वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या एका गटाने जगातील उत्कृष्ट कला, कविता, संगीत, नाट्य व नृत्य यांचे नमुने छोट्या डिस्कमध्ये भरले असून, या डिस्क रोव्हरद्वारे पुढीलवर्षी चंद्रावर पाठविल्या जाणार आहेत. हा रोव्हर कार्नेजी मेलन विद्यापीठाच्या रोबोटिक्स विभागाने तयार केला असून, ३० दशलक्ष डॉलर किमतीच्या गुगल लुनार पुरस्कार स्पर्धेत उतरवला जाणार आहे. या स्पर्धेअंतर्गत खाजगी संस्थांनी स्वत:च्या निधीवर तयार केलेले रोबो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवले जाणार आहेत. पृथ्वीच्या या भेटी कार्नेजी मेलन विद्यापीठाच्या रोव्हरमार्फत चंद्राला मिळणार आहेत, असे टेक टाईम्सने म्हटले आहे. प्रसिद्ध रोबोटिसिस्ट व अॅस्ट्रोबोटिकचे संशोधक विल्यम रेड व्हिटकार हे कार्नेजीच्या रोव्हरवर आर्टस् विभाग वेगळा करणार असून त्यात कला, शिल्प, वास्तु, संरचना, संगीत, नृत्य यांचे प्रतिनिधित्व करणारे नमुने ठेवले जातील. या विभागाचे वजन ६ औंस वा सोड्याच्या अर्ध्या बाटलीइतके राहील. मून आर्टस् टीमने या विभागाचे तांत्रिक काम पूर्ण केले असून, फोटोटाईपही पूर्ण झाले आहे. (वृत्तसंस्था)
उत्कृष्ट कलेच्या डिस्क चंद्रावर पाठविणार
By admin | Published: July 06, 2015 11:15 PM