वॉशिंग्टन : इराण आणि जागतिक महासत्ता यांच्यातील बहुप्रतीक्षित अणुकरार वाटाघाटी अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे वृत्त असतानाच अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी उभय देशांतील दुरावा मिटविण्यासाठी सध्या सर्वोत्तम काळ असल्याचे म्हटले आहे. पारशी नववर्ष नवरोज निमित्ताने व्हाईट हाऊसने ओबामांचे निवेदन जारी केले आहे. यात ओबामा म्हणाले, यंदा आम्हाला अनेक दशकांनंतर एक सर्वोत्तम संधी प्राप्त झाली आहे. या संधीचा लाभ घेऊन आम्ही भविष्यात द्विपक्षीय संबंध एका चांगल्या वळणावर घेऊन जाऊ शकतो. इराणची जनता आणि नेत्यांना संबोधित करताना आगामी दिवस आणखी महत्त्वाचे असतील, असा विश्वास ओबामांनी व्यक्त केला.कोणताही देश आणि व्यक्तीचा नामोल्लेख न करता ओबामा म्हणाले की, ‘आमच्या चर्चेने प्रगती केली आहे. तथापि काही मुद्यांवर तोडगा काढावा लागणार आहे. दुसरीकडे दोन्ही देशांत आणि बाहेरही काही लोक या मुत्सद्दी वाटाघाटींच्या विरोधात आहेत.’ आम्हाला हव्या असलेल्या भविष्यासाठी आम्ही सोबत येऊन चर्चा करू शकतो, असे आवाहन ओबामांनी इराणी जनतेला केले.ओबामांच्या या भाषणापूर्वी अमेरिकी परराष्ट्रमंत्री जॉन केरी व त्यांचे इराणी समपदस्थ जावेद जरीफ यांनी उभय देशांतील चर्चेत चांगली प्रगती झाली असल्याचे सांगितले. दोन्ही देशांतील मतभेद दूर करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी मुत्सद्देगिरीचा वापर केला जावा, असे ओबामा म्हणाले. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी अण्वस्त्र निर्मितीविरोधात फतवा जारी केला आहे आणि राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनीही इराण कदापि अण्वस्त्रे विकसित करणार नसल्याची ग्वाही दिल्याकडे ओबामांनी लक्ष वेधले. (वृत्तसंस्था)१९७९ साली इराणध्ये क्रांती झाली. यानंतर अमेरिका व इराण यांच्यात कोणतेही मुत्सद्दी संबंध नाहीत. तेहरान येथील अमेरिकी दूतावासाचाही इराणने ताबा घेतला होता.पी५+१ देशांद्वारे इराणसोबत अणू वाटाघाटी सुरू आहेत. चीन, रशिया, ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी या देशांचा या वाटाघाटीत समावेश आहे. अणुकोंडी फोडण्यासाठी हे देश प्रयत्नशील आहेत.इराणने शांततापूर्र्ण उद्देशासाठी अणू कार्यक्रम राबवावा म्हणून हे देश वाटाघाटी करत आहेत. तत्पूर्वी, इराण आणि सहा जागतिक महासत्ता यातील अणू वाटाघाटींचा अंतिम आराखडा ३१ मार्चपूर्वी जारी होणे अपेक्षित आहे.
दुरावा मिटविण्यासाठी सर्वोत्तम घटिका!
By admin | Published: March 20, 2015 11:46 PM