पॅरिस : भांगेवर आधारित असलेल्या नव्या वेदनाशामक औषधाची चाचणी सुरू असताना फ्रान्समध्ये गंभीर घटना घडली असून चाचणी प्रक्रियेतील एका व्यक्तीचा मेंदू मृत झाला, तर इतर पाच जणांची प्रकृती बिघडल्यामुळे इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. फ्रान्सच्या आरोग्यमंत्र्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. फ्रान्सच्या आरोग्यमंत्री मेरिसोल टोरीन यांनी सांगितले की, वायव्य फ्रान्स भागातील रेनेस येथील एका युरोपीय प्रयोगशाळेत नव्या वेदनाशामक औषधाचे संशोधन सुरू होते. त्याची मानवी चाचणी घेतली जात होती. आता हा अभ्यास तातडीने थांबविण्यात आला असून त्यात भाग घेणाऱ्या सर्व स्वयंसेवकांना कंपनीने परत बोलावले आहे. यात नेमक्या किती व्यक्ती आहेत, किती जणांवर चाचणी सुरू होती, याची निश्चित माहिती मिळू शकली नाही. पॅरिसच्या सरकारी वकिलाच्या कार्यालयाने सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री तातडीने रेनेसकडे रवाना झाल्या आहेत. यात काहीही दडवले जाणार नाही, असे आरोग्यमंत्र्यांनी पत्रकारांना रेनेसकडे जाण्यापूर्वी सांगितले. तोंडावाटे घ्यावयाच्या या वेदनाशामकाची पहिल्या टप्प्यातील चाचणी सध्या सुरू होती. यातील पहिली व्यक्ती आठवड्याच्या प्रारंभीच आजारी पडली. तिला तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आले. (वृत्तसंस्था)
भांगेवर आधारित औषधाची चाचणी; एकाचा मेंदू मृत
By admin | Published: January 16, 2016 1:13 AM