डोंबिवली - 'टूरीस्ट व्हिसा'वर दुबईत गेल्यानंतर गायब झालेल्या भिवंडीतील महिलेच्या प्रकरणाची परराष्ट्र मंत्रालयाकडून दखल घेण्यात आली आहे. भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी पत्राद्वारे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे लक्ष वेधल्यावर परराष्ट्र मंत्रालयाकडून तातडीने हालचाली झाल्या. त्यानंतर महिलेचा शोध सुरू झाला. ती दुबईतून ओमानला गेली असल्याचे स्पष्ट झाल्यावर आता तिला ओमानहून भिवंडीत परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने प्रयत्न सुरू केले आहेत. खासदार कपिल पाटील यांच्या प्रश्नावर लोकसभेत उत्तर देताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्या महिलेला पुन्हा भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे सांगितले.
भिवंडीतील रहिवाशी नूरजहा गुलाम खान दुबईला `टूरीस्ट व्हिसा'वर गेल्या होत्या. मात्र, त्यांचा संपर्क होत नव्हता. त्यानंतर त्यांच्या भिवंडीतील कुटुंबियांनी तातडीने खासदार कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन खासदार कपिल पाटील यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना १ जुलै रोजी पत्र पाठविले. त्याची परराष्ट्र मंत्रालयाने गंभीर दखल घेतली. भारताच्या दुबईतील वकिलातीने नूरजहाचा शोध घेतला. तसेच सुरक्षा यंत्रणांकडून माहिती घेतली. त्यावेळी ती ओमानला गेली असल्याचे स्पष्ट झाले. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी ४ जुलै रोजी पत्राद्वारे कपिल पाटील यांना नूरजहा दुबईतून ओमानला गेली असल्याचे कळविले. तसेच तिच्याबद्दल कुटुंबियांकडून आणखी माहिती मागविली होती. त्यानंतर नूरजहाच्या कुटुंबियांनी ओमानमधील तिचा पत्ता व दूरध्वनी क्रमांक कळविला. यासंदर्भात खासदार कपिल पाटील यांनी १४ जुलै रोजी सर्व माहिती परराष्ट्र मंत्रालयाला कळविली आहे.
या प्रकरणाकडे खासदार कपिल पाटील यांनी लोकसभेचे काल बुधवारी लक्ष वेधले. नूरजहाला भारतात केव्हा परत आणणार, असा सवाल खासदार पाटील यांनी विचारला. त्यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ओमानहून नूरजहाला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर परदेशात हरविलेल्या भारतीय नागरिकांच्या शोधासाठी व तेथील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकार कटीबद्ध असल्याचे स्पष्ट केले.