नवी दिल्ली, दि. 10- डोकलाम आमचाच भूभाग असून, डोकलामवरुन आम्ही दावा सोडलेला नाही असे भूतान सरकारने गुरुवारी स्पष्ट केले. चीनकडून देण्यात येणारी माहिती पूर्णपणे चुकीची असून, दिशाभूल करणारी असल्याचे भूतानने सांगितले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी डोकलाम चीनच्या हद्दीत येत असल्याचे भूतानने मान्य केल्याचा दावा केला होता. भारत आणि चीनचे सैन्य डोकलाममध्ये जिथे समोरा-समोर उभे ठाकले आहे तो भाग भूतानच्या हद्दीत येत नाही असे भूतानने डिप्लोमॅटिक चॅनलच्या माध्यमातून बिजींगला कळवले आहे. चीनचे राजनैतिक अधिकारी वँग वीनली यांनी हा दावा केला होता.
वीनली यांनी भारतीय पत्रकारांना बुधवारी ही माहिती दिली. डोकलाम सारख्या महत्वाच्या विषयावर भूतानने ही बाब कशी मान्य केली त्यासंबंधी कोणतेही पुरावे वीनली सादर करु शकल्या नाहीत. भूतान सरकारमधील अधिकृत सूत्रांनी एएनआयबरोबर फोनवरुन बोलताना याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली.
डोकलामप्रश्नी आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. 29 जून 2017 रोजी भूतानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर जी माहिती प्रसिद्ध केलीय ती आमची अधिकृत भूमिका आहे. डोकलाममध्ये थेट रस्ता बांधायला सुरुवात करणे हे कराराचे उल्लंघन आहे. दोन देशांमधील सीमांकन करण्याची प्रक्रिया यामुळे बाधित होईल असे भूतानने म्हटले आहे.
डोकलाममध्ये भारत आणि चीनमध्ये रस्तेबांधणीवरुन निर्माण झालेला संघर्ष चिघळत चालला असून, चीनने डोकलाममध्ये सैनिकांची संख्या वाढवली आहे. डोकलामधील वादग्रस्त जागेपासून एक किलोमीटरच्या अंतरावर चीनने 800 सैनिकांची तैनाती केल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. चीनने या भागात 80 तंबू टाकले आहेत. चीनने अजून इथे आपली पूर्ण बटालियन तैनात केलेली नाही. संघर्ष सुरु आहे तिथे आधीपासूनच चीनने 300 सैनिक तैनात केले आहेत.
सिक्कीमच्या भागात भारताचे 350 जवान तैनात आहेत. भारतीय चीनच्या बाजूला कोणतीही हालचाल होत नसल्याचे लष्कराने म्हटले आहे. भारतीय लष्कराने आपल्या तुकडयांसाठी दोन आठडयांचा ऑपरेशन अलर्ट कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर-ऑक्टोंबरऐवजी ऑगस्टमध्ये हा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येईल. डोकलाममध्ये दोन्ही देशांचे सैन्य समोरा-समोर उभे ठाकल्याच्या घटनेला आता 50 पेक्षा जास्त दिवस झाले आहेत.