इस्त्रायल आणि हमासमध्ये गेल्या काही दिवसापासून युद्ध सुरू आहे, काल हमासमधील एका रुग्णालयावर हल्ला झाला. या हल्ल्यात ५०० जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्त्रायलला भेट दिली. यावेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धग्रस्त प्रदेशात पाणी, अन्न आणि इतर पुरवठा करण्यास परवानगी दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवारी तेल अवीवमध्ये इस्रायलच्या पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर या सर्व घडामोडी घडल्या आहेत. मात्र, या लढ्यात आपण पूर्णपणे इस्रायलच्या पाठीशी आहोत आणि हॉस्पिटलवरील हल्ल्यामागे इस्रायलचा हात नसून अन्य कोणाचा तरी हात असल्याचेही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी नमूद केले.
१२ दिवसांनंतर गाझामध्ये खाद्यपदार्थ पोहोचले, नेतन्याहूंनी बायडेन यांच्या आवाहनाला सहमती दिली
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आज इस्रायलला भेट देणार असून पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि राष्ट्राध्यक्ष इसाक हरझोग यांची भेट घेऊन युद्ध परिस्थितीवर चर्चा करणार आहेत. आमच्या गुप्तचर मूल्यांकनातून असे दिसून आले आहे की, गाझा रुग्णालयावरील हल्ल्यासाठी इस्रायल जबाबदार नाही, ज्यात सुमारे ५०० लोकांचा मृत्यू झाला, असा दावा युनायटेड स्टेट्स अमेरिकेने केला.
इस्त्रायली अधिकाऱ्यांनी हल्ल्याबाबत अजून कोणतेही विधान केलेले नाही, पण तरीही गाझावरील हल्ल्यासाठी अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा दिल्याचा दावा करण्यात आला आहे. ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासच्या प्राणघातक हल्ल्यानंतर सुरू झालेल्या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंच्या ४००० हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध काल बुधवारी सलग १२ व्या दिवशीही सुरूच होते. दरम्यान, गाझा येथील रुग्णालयावर झालेल्या हल्ल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या हल्ल्यात ४७१ लोकांच्या मृत्यूला इस्रायल जबाबदार असल्याचा हमासचा दावा आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हॉस्पिटलमध्ये हा स्फोट हमासच्या रॉकेटमुळे झाल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन बुधवारी तेल अवीवमध्ये पोहोचले. येथे पंतप्रधान नेतन्याहू यांनी स्वतः विमानतळावर त्यांचे स्वागत केले. यानंतर दोन्ही नेत्यांची बैठक झाली. यावेळी गाझा येथील रूग्णालयावर झालेल्या हल्ल्याचाही उल्लेख करण्यात आला.