टेक्सास: भारतीय-अमेरिकन नागरिक सुरेंद्रन के. पटेल अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील जिल्हा न्यायाधीश बनले आहेत. गरीब मजूर कुटुंबात जन्मलेल्या सुरेंद्रनची यशोगाथा एखाद्या चित्रपटासारखी वाटते. सुरेंद्रन यांनी दहावीनंतर शिक्षण सोडले आणि ते विडी कामगार बनले. यानंतर नशीब फिरले आणि ते अमेरिकेला गेले.
द वीकच्या वृत्तानुसार, सुरेंद्रन यांचा जन्म केरळमधील कासारगोड येथे एका रोजंदारी मजुराच्या घरी झाला होता. त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. ते बहिणीसोबत विडी बनवायचे. कौटुंबिक स्थिती हलाखीची असल्याने त्यांनी दहावीनंतर शिक्षण सोडले आणि पूर्णवेळ विडी कामगार बनले.
पत्नीमुळे गेले अमेरिकेला
२००७ मध्ये पत्नीमुळे दोघे अमेरिकेला गेले. तिला ह्युस्टनमध्ये नोकरी मिळाली होती. त्यावेळी सुरेंद्रन सेल्समन म्हणून काम करायला लागले. यानंतर त्यांनी अमेरिकेतही वकील म्हणून प्रॅक्टिस सुरू केली. पुढे २०१७ मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले.
हॉटेलमध्ये नोकरी अन् वकिली
वकील होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी कालिकतच्या सरकारी लॉ कॉलेजमध्ये एलएल.बी.साठी प्रवेश घेतला. पण पुन्हा आर्थिक समस्या होती. पहिल्या वर्षी काही मित्रांनी मदत केली. १९९५ मध्ये पदवी मिळाल्यानंतर त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. २००४ मध्ये सुभा हिच्याशी त्यांनी लग्न केले. दरम्यान, सुभाला स्टाफ नर्सची नोकरी मिळाली आणि दोघे दिल्लीला शिफ्ट झाले. नंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली.
परीक्षेसाठी नव्हती मिळत परवानगी
वर्षभराच्या विश्रांतीनंतर त्यांनी पुन्हा शिक्षण सुरू केले. त्यांना इके नायनार मेमोरियल महाविद्यालयात प्रवेश मिळाला. पण, ते अजूनही विडी बनवित असल्याने कॉलेजमध्ये गैरहजेरी जास्त होती. त्यामुळे त्यांना परीक्षेला बसू दिले नाही. त्यानंतर त्यांनी शिक्षकांकडे परीक्षेला बसण्याची परवानगी मागितली. सहानुभूती मिळविण्यासाठी विडी कामगार असल्याचे त्यांनी कधी सांगितले नाही. उलट, चांगले गुण मिळाले नाहीत तर मी शिक्षण सोडेन, असे त्यांनी शिक्षकांना सांगितले.