वॉशिंग्टन : अमेरिकी हवाई दलाच्या (Us Air force) बड्या पदावरून निवृत्त झालेल्या एका माजी अधिकाऱ्याने धक्कादायक दावा केला आहे. एलियन्समुळे जगामध्ये तिसरे विश्वयुद्ध (world war 3 ) भडकण्याची शक्यता त्याने व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर एलियन्सना अमेरिकेच्या अण्वस्त्रांशी छेडछाड करताना पाहिल्याचा दावा केला आहे. लवकरच अमेरिकेच्या हवाई दलाचे चार माजी प्रमुख या घटनांचा खुलासा करणार आहेत. यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे.
रॉबर्ट सालास यांनी हा दावा केला आहे. त्यांनी अमेरिकी हवाई दलाच्या शस्त्रास्त्र नियंत्रण कक्षात काम केले आहे. त्यांनी इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईलच्या डिव्हिजनची लाँच अधिकाऱ्याची जबाबदारी सांभाळली आहे. एवढेच नाही तर त्यांनी अमेरिकेच्या सर्वात शक्तीशाली आणि विध्वंसक अण्वस्त्रवाहू मिसाईल टाइटन-3 प्रोग्रॅममध्ये मिसाईल प्रपल्शन इंजिनिअर म्हणून काम पाहिले आहे. तसेच अन्य अंतराळातील ऑपरेशनच्या मोठ मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याने दावा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. परग्रहावरून आलेल्या युएफओने अमेरिकेच्या अण्वस्त्र ठिकाणांवरील शस्त्रास्त्रे, मिसाईले डागण्याची तयारी सुरु केली होती. यामध्ये त्यांची सर्व 10 इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाइले निकामी झाली होती, असे त्यांनी म्हटले आहे.
ही घटना 1967 ची आहे. मोंटााच्या माल्मस्ट्रॉम एयर फ़ोर्स बेसवर एका अंडरग्राऊंड लाँच कंट्रोलचे ते कमांडर होते. 16 मार्चला म्हणजेच आठ दिवस आधी देखील अशा प्रकारची घटना मिसाईल लाँच कंट्रोल सिस्टिममध्ये देखील झाली होती. हवाई दलाचे चार माजी प्रमुख लवकरच याची कागदपत्रे उघड करतील असेही ते म्हणाले.