खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर हत्याकांडावरून कॅनडाने आणखी एक मोठा दावा केला आहे. हे हल्लेखोर देशाबाहेर गेलेले नसून कॅनडा पोलीस लवकरच दोन आरोपींना अटक करतील, असा दावा स्थानिक वृत्तपत्र द ग्लोब अँड मेल ने केला आहे. दोन्ही संशयितांवर पोलीस नजर ठेवून असून काही आठवड्यांतच या दोघांना अटक केली जाण्याची शक्यता आहे, असे यात म्हटले आहे.
निज्जरची हत्या करणाऱ्या लोकांनी कॅनडा सोडलेले नाही. ते कॅनडातच राहत आहेत, असे वृत्तपत्राने तीन सुत्रांच्या मदतीने म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस त्यांच्यावर नजर ठेवून आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. जेव्हा आरोप निश्चित केले जातील तेव्हा पोलीस त्यांची हत्येतील भूमिका आणि भारत सरकारच्या कथित भूमिकेबद्दल सविस्तर बोलतील, असे यात म्हटले आहे.
भारताने निज्जरला २०२० मध्ये दहशतवादी घोषित केले होते. त्याच्या हत्येमागे भारताचाच हात असल्याचा आरोप कॅनडाने केला होता. निज्जरची गेल्या जूनमध्ये ब्रिटश कोलंबियातील एका गुरुद्वारा बाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर कॅनडाच्या पंतप्रधानांनी अमेरिकेचा हवाला देत भारतावर आरोप केले होते. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने देखील आणखी एक खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येच्या कटावरून भारतीय अधिकाऱ्याला पकडल्याचा दावा केला होता. यामुळे कॅनडाला आणखी बळ मिळाले आहे.
भारताने अमेरिका आणि कॅनडाच्या दाव्यांमध्ये मोठी तफावत असल्याचे म्हटले होते. अमेरिकेने पन्नू प्रकरणात काही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे, परंतु कॅनडाने तसे काहीच दिलेले नाहीय. फक्त हवेत आरोप केले आहेत. निज्जरची हत्या करण्यासाठी सहा लोक दोन वाहनांतून आले होते, असा दावा वॉशिंग्टन पोस्टने केला होता.