कोलंबो : श्रीलंकेमध्ये राजकीय घमासान माजले असून गुरुवारी संसदेमध्ये मोठा राडा झाला. पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांनी दावा केला की आवाजी मतदानाद्वारे आपल्याला हटविण्याचा अधिकार संसदेच्या अध्यक्षांना नाही. मंगळवारी राजपक्षे यांच्यावर अविश्वार ठराव आणण्यात आला होता. यानंतर संसदेमध्ये तुफान राडा झाला होता.
श्रीलंकेमध्ये गुरुवारी पुन्हा संसदेचे कामकाज बोलावण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष कारु जयसुर्या यांनी सांगितले की, देशात सध्या कोणाचेही सरकार अस्तित्वात नाही. तसेच आता या क्षणाला कोणीही पंतप्रधान नाहीय, जरी तो राष्ट्रपतींना नियुक्त केलेले राजपक्षे असोत किंवा त्यांचे विरोधी विक्रमसिंघे.
यावर राजपक्षे यांनी अध्यक्षांच्या वक्तव्याला विरोध करताना सांगितले की, आवाजी मताने कोणताही विशेष प्रश्नावर मतदान घेता येत नाही. तसेच अध्यक्षांना पंतप्रधान आणि मंत्र्यांना हटविण्याचा अधिकार नाही. अध्यक्ष पक्षपातीपणा करत आहेत. ते त्यांच्या पक्षाचे नेतृत्व करत असून या प्रश्नावरील उत्तम उतारा म्हणजे पुन्हा निवडणुका घ्याव्यात.
विरोधी पक्षाच्या खासदारांनी राजपक्षे यांच्या वक्तव्यावर मतदान घेण्याची मागणी करत सभागृहात येऊन जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यानंतर 35 ते 36 खासदार एकमेकांना भिडले. हाणामारीवेळी काहीजण जमिनीवरही कोसळले. राजपक्षे यांच्या समर्थकांनी अध्यक्षांच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या, पुस्तके फेकण्यास सुरुवात केली. जवळपास अर्धा तास हा राडा सुरु होता. यानंतर जयसुर्या यांनी कामकाज तहकूब केले.