दक्षिण कोरियामध्ये हवाई दलाकडून मोठी चूक घडली आहे. द. कोरियाच्या एअरफोर्सच्या विमानातून काही घरांवर बॉम्ब पडले आहेत. या बॉम्बचा स्फोट झाल्याने १५ लोक जखमी झाले आहेत, यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
पोचेऑनमध्ये लष्करी सराव केला जात होता. यावेळी लष्करी विमानातून बॉम्ब टाकण्यात आला. हे बॉम्ब मानवी वस्तीमध्ये पडल्याने अनेक घरे आणि चर्चचे नुकसान झाले आहे. या स्फोटानंतर परिसर हादरला होता. आजुबाजुच्या लोकांना काही कळत नव्हते. उत्तर कोरियाशी वैर असल्याने सुरुवातीला काहींना हल्ले सुरु झाल्याचे वाटले. परंतू, नंतर आपल्याच देशाच्या विमानातून बॉम्ब टाकण्यात आल्याचे समोर आले.
राजधानी सोलपासून पोचेऑन हे गाव ४० किमी अंतरावर आहे. दक्षिण कोरियाच्या हवाई दलानुसार KF-16 जेट विमानांमधून ५०० पाऊंड एवढ्या वजनाचे आठ बॉम्ब टाकण्यात आले. हवाई दलाने या घटनेवर खेद व्यक्त केला आहे, तसेच जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत असे म्हटले आहे. या घटनेची चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्व लाईव्ह-फायर प्रशिक्षण स्थगित करण्यात आले आहेत. तसेच चौकशीसाठी एक पथक स्थापन करण्यात आले असून हवाई दलाने नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
पायलटने केलेली ही चूक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याने बॉम्ब टाकण्याचे कोऑर्डिनेट्स चुकीचे टाकल्याने दुसऱ्याच ठिकाणी हे बॉम्ब फेकले गेल्याचे हवाई दलाने म्हटले आहे. ग्रामीण भाग असल्याने आठ ब़ॉम्ब पडूनही जास्त जिवीतहानी झालेली नाही. अन्यथा मोठा अनर्थ ओढविला असता असे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. या स्फोटात दोन इमारती आणि एक ट्रक नेस्तनाभूत झाले आहेत. तसेच एका चर्चच्या काही भागाला नुकसान झाले आहे. अमेरिकी लष्करासोबत हा सराव केला जात होता.