रशियात मोठ्या हालचाली! रातोरात मॉस्कोत रणगाडे, लष्करी वाहने; वॅगनर ग्रुपने रशियन चौक्या ओलांडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 08:41 AM2023-06-24T08:41:14+5:302023-06-24T11:14:28+5:30
रातोरात मॉस्कोच्या रस्त्यांवर अनेक टँकर पाहून नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण तयार झाले आहे. क्रेमलिनच्या आजुबाजुच्या परिसरात केवळ टँकच नाही तर मोठ्या प्रमाणावर सैन्याची वाहने दिसू लागली आहेत.
युक्रेनवर पहिल्याच दोन दिवसांत विजय मिळविण्याच्या इराद्याने रशियाने केलेला हल्ला फसला आहे. आता दीड वर्ष झाले तरी युक्रेनच्या मोठ्या भूभागावर कब्जा करता आलेला नाहीय. युद्ध थांबवले तर नाचक्की आणि सुरु ठेवले तरी नाचक्कीच अशा पेचात सापडलेल्या रशियामध्ये रातोरात मोठ्या हालचाली झाल्या आहेत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना त्यांची सत्ता उलथवून लावली जाण्याची भीती सतावू लागली आहे. यामुळे त्यांनी राष्ट्राध्यक्ष कार्यालय क्रेमलिनच्या सुरक्षेसाठी मॉस्कोत रणगाडे तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचाच खाजगी मिलिशिया वॅगनर ग्रुप त्यांना सत्तेतून काढून टाकण्यासाठी बंडाचा प्रयत्न करू शकतात, अशी भीती पुतीन यांना वाटू लागली आहे. रातोरात मॉस्कोच्या रस्त्यांवर अनेक टँकर पाहून नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण तयार झाले आहे. क्रेमलिनच्या आजुबाजुच्या परिसरात केवळ टँकच नाही तर मोठ्या प्रमाणावर सैन्याची वाहने दिसू लागली आहेत.
युक्रेनमधील बाखमुट येथील वॅगनर प्रशिक्षण शिबिरावर क्षेपणास्त्र हल्ला झाला होता. यामुळे या संघटनेचा प्रमुख येवगेनी प्रीगोझिन संतापला आहे. त्याने यासाठी क्रेमलिनला जबाबदार मानले आहे. यासाठी रशियाला शिक्षा आणि सूड उगवण्याची शपथही त्यांनी घेतली आहे. वॅगनरचे डझनभर सैनिक मारले गेले आहेत. आम्ही मॉस्कोकडे कूच करत आहोत. जो कोणी आमच्या केंद्रात प्रवेश करेल तो यासाठी जबाबदार असेल, असे त्याने म्हटले आहे.
वॅगनर गटाच्या सैनिकांनी नोव्होचेरकास्कच्या मार्गावरील पहिली चौकी आधीच ओलांडली आहे. रशियन सैन्याचे मुख्यालय नोवोचेरकास्क येथे आहे. त्यानंतर मॉस्कोच्या रस्त्यावर चिलखती वाहनांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. अमेरिकाही या घटनेवर बारीक लक्ष ठेवून आहे. रशियन स्पेशल फोर्सने मॉस्कोभोवती नाकाबंदी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
रशियाची महत्त्वाची लष्करी चौकी रोस्तोवमध्ये रणगाडे आणि चिलखती वाहने दिसली आहेत. याआधीच्या फुटेजमध्ये एक चिलखती वाहनांचा ताफा पुतीन यांना आणीबाणीच्या बैठकीसाठी क्रेमलिनला घेऊन जात असल्याचे दिसले. पुतिनच्या जवळच्या श्रीमंत लोकांमध्ये दहशत पसरली आहे. मॉस्कोजवळील फ्रायझिनो येथे आज रात्री एक लष्करी युनिट जळत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.