काबुल - तालिबाननेअफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून या देशामध्ये दररोज नवनव्या घडामोडी घडत आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घानी यांनी देश सोडून पळ काढल्यानंतर आता त्यांचे भाऊ हशमत घानी अहमदजई यांनी तालिबानचा हात पकडला आहे. हशमत घानी हे तालिबानमध्ये दाखल झाल्याचे वृत्त आले आहे. ( Afghanistan President Ashraf Ghani's brother joins the Taliban )
हशमत घानी अहमजदई यांनी तालिबानला पाठिंबा देण्याचा निर्णय हा अल्हाज खलील-उर-रहमान हक्कानी याच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर घेतला आहे. मिळत असलेल्या वृत्तांनुसार ग्रँड कौन्सिल ऑफ कुचिसचे प्रमुख हशमत घानी यांनी तालिबानला आपल्या पाठिंब्याची घोषणा केली तेव्हा तालिबानचा नेता खलील उर रहमान आणि धार्मिक स्कॉलर मुफ्ती महमूद झाकीर हे उपस्थित होते.
अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानमधून माघार घेण्यास सुरुवात केल्यानंतर तालिबानने पद्धतशीरपणे अफगाणिस्तानवर कब्जा केला. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या १५ दिवसांत तालिबानने जोरदार मुसंडी मारत थेट राजधानी काबूल पर्यंत धडक दिली. तसेच राष्ट्रपती अश्रफ घानी देशाबाहेर पळून गेल्यानंतर सर्व सत्तासुत्रे ताब्यात घेत राजधानीतील सर्व सरकारी इमारतींवर कब्जा केला आहे.