नवी दिल्ली: दिग्गज गॅरी कास्पारोव्ह यांनी बुद्धिबळविश्वावर अनेक वर्ष राज्य केलं. आजही बुद्धिबळ म्हटलं की सर्वप्रथम गॅरी यांचं नाव ओठावर होतं. या खेळाचे चाणक्य म्हणूनही त्यांचे हितचिंतक त्यांना ओळखतात. पण, आता या खेळातील दिग्गजाला रशियाने दहशतवादी घोषित केले आहे. त्यांचा रशियाच्या 'दहशतवादी आणि अतिरेकी' यादीत समावेश करण्यात आला आहे. रशियाने आर्थिक वॉचडॉगने बुधवारी बुद्धिबळ ग्रँडमास्टर आणि राजकीय कार्यकर्ते गॅरी कास्पारोव्ह यांच्यावर ही कारवाई अर्थात त्यांना दहशतवादी संबोधले. सोव्हिएतमध्ये जन्मलेले माजी जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन कास्पारोव्ह हे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे दीर्घकाळ विरोधक राहिले आहेत आणि जवळजवळ एक दशकापासून युनायटेड स्टेट्समध्ये ते वास्तव्यास आहेत.
६० वर्षीय माजी जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन राहिलेले गॅरी कास्पारोव्ह हे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे दीर्घकाळ विरोधक आहेत आणि युक्रेनमध्ये रशियाच्या लष्करी हल्ल्याच्या विरोधात वारंवार त्यांनी भाष्य केलं आहे. विशेष बाब म्हणजे कोणतेही स्पष्ट कारण न देता कास्पारोव्ह यांचा दहशतवादी लोकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, कास्पारोव्ह यांना जगातील महान बुद्धिबळपटूंपैकी एक म्हणून ओळखले जाते. त्यांनी एक दशकाहून अधिक काळ युनायटेड स्टेट्समध्ये वास्तव्य केलं आहे, जिथं त्यांनी राजकीय सक्रियतेवर लक्ष केंद्रित करून रशियातील सद्य घडामोडींवर सातत्यानं टीका केली. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांनी युक्रेनची राजधानी कीवसाठी पाश्चिमात्य देशांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं. तसेच लोकशाही संक्रमणासाठी युक्रेनला रशियाची राजधानी मास्कोला पराभूत करावं लागेल असं विधान केलं होतं.