इंग्लंड हा आपल्या देशातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना सात मिनिटांच्या आत उपचाराचे औषध इंजेक्ट करणारा जगातील पहिला देश ठरणार आहे. खरे तर, इंग्लंडमधील सरकारी राष्ट्रीय आरोग्य सेवा (NHS) जगातील पहिलीच अशी सेवा बनणार आहे, जी एका इंजेक्शनच्या सहाय्याने देशातील शेकडो कॅन्सर रुग्णांवर कमी वेळेत उपचार करू शकेल. एवढेच नाही, तर उपचाराचा कालावधीही तीन चतुर्थांशांनी कमी करू शकते.
ब्रिटिश मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीकडून (MHRA) मंजुरी मिळाल्यानंतर, NHS ने मंगळवारी सांगितले की, ज्या शेकडो कॅन्सरग्रस्तांवर इम्यूनोथेरेपीच्या माध्यमाने उपचार केला जात होता, आता त्यांना "त्वचेच्या खाली" एटेझोलिझुमॅबचे इंजेक्शन देण्याची तयारी आहे. यामुळे कॅन्सरच्या उपचारात वेळेची बचत होऊ शकते.
यासंदर्भात अधिक माहिती देताना NHS ने म्हटले आहे, एटेझोलिझुमॅब, यालाच टेकेंट्रिक देखील म्हटले जाते. हे साधारणपणे रुग्णांना थेट त्यांच्या रक्तवाहिण्यांमधून ड्रिपद्वारे दिले जाते. काही रुग्णांमध्ये या प्रक्रियेला 30 मिनिटे अथवा एक तासही लागतो. तसेच, ज्या रुग्णांच्या रक्तवाहिण्यांरर्यंत औषध पोहोचणे कठीण होते, त्यांना अधिक वेळही लागू शकतो. मात्र आता नव्या पद्धतीने हे औषध रक्तवाहिन्यांद्वारे न देता, त्वचेखाली इंजेक्ट केले जाते. असे करणारा इंगलंड हा पहिलाच देश असेल. टेसेंट्रिक ही एक मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे, जी कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या रोगप्रतिकारक यंत्रणेवर परिणाम करते.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, वेस्ट सफोल्क एनएचएस फाउंडेशन ट्रस्टचे सल्लागार ऑन्कोलॉजिस्ट डॉ अलेक्झांडर मार्टिन म्हणाले, "या मंजुरीमुळे आम्हाला आमच्या रूग्णांसाठी अधिक चांगल्या पद्धतीने आणि वेगाने उपचार करता येतील. एवढेच नाही तर, यामुळे आमचे चमू अधिकाधिक रुग्णांवर उपचार कण्यास सक्षम होतील. याशिवाय, "या पद्धतीत केवळ सात मिनिटेच लागतात. तर, सध्या वापरल्या जाणाऱ्या ड्रिप पद्धतीला 30 ते 60 मिनिटे लागतात." असे रोशे प्रोडक्ट्स लिमिटेडचे वैद्यकीय संचालक मारियस शॉल्झ यांनी म्हटले आहे.