रशियातून एक मोठी बातमी येत आहे. ब्रिटिश वृत्तपत्र द सननुसार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यावर युक्रेनने ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. पुतीन असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावरच ड्रोन क्रॅश झाल्याने पुतीन यांच्या हत्येचा प्रयत्न फसला असता तरी याचे युद्धावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
हे वृत्त अशावेळी प्रकाशात आलेय जेव्हा चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनी राष्ट्राध्यक्षांना सुमारे तासभर फोन करून समजावले आहे. जिनपिंग यांनी जेलेन्स्की यांच्यांकडे शांती प्रस्ताव मांडला आहे. जिनपिंग यांचा हा युक्रेन युद्धानंतर पहिलाच फोन आहे.
पुतीन एका औद्योगिक पार्कच्या पाहणीसाठी गेले होते. ही घटना गेल्या आठवड्यातील आहे असे सांगितले जात आहे. पुतीन जिथे होते, त्याच्या काही अंतरावरच हा स्फोटकांनी भरलेला ड्रोन सापडला आहे. हा ड्रोन त्याच्या रिमोटच्या रेंजच्या बाहेर तरी गेला असेल किंवा मॉस्कोवर चकरा मारत होता असेल असा अंदाज लावला जात आहे. हा UJ-22 ड्रोन नोगिंस्कच्या जंगलात सापडला आहे. या ड्रोनमध्ये कॅनेडियन M112 स्फोटके होती. ती १७ किलो पेक्षा जास्त होती. म्हणजे पुतीन यांच्यासह त्यांच्या सोबतच्या सर्वांना उडविण्याचा प्लान होता.
पुतीन यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा दावा करणाऱ्या युक्रेनी कार्यकर्ता यूरी रोमनेंकोने मोठा खुलासा केला आहे. युक्रेनी गुप्तचर अधिकाऱ्यांना पुतीन औद्योगिक पार्कमध्ये जाणार असल्याची टीप लागली होती. त्यांना मारण्यासाठी जी माहिती मिळाली त्यावरून हे ड्रोन पाठविण्यात आले. परंतू ते रशियाच्या हवाई हद्दीत कोसळले, असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.