ऑनलाइन लोकमत
दोहा, दि. 5- पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कतार देशाच्या दौ-यावर आहेत. कतारमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे राज्यकर्ता शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्यात 7 सामंजस्य करार झाले आहेत. पर्यटन, आरोग्य, अर्थ आणि गुंतवणुकीसंदर्भात हे करार करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कतारमधल्या व्यावसायिकांना भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं आहे. राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा फंडमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात हे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या सामंजस्य करारामुळे पर्यटन, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्राला सहकार्य मिळणार आहे. यावेळी दोहामध्ये आमिरी दिवान या पुरस्कारानं मोदींचा सन्मानही करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताचे प्रतिनिधी या नात्यानं कतारचे राज्यकर्ता शेख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छापत्र दिलं.
भारतात गुंतवणुकीला मोठी संधी आहे. या संधीचा तुम्ही लाभ घ्यावा, असा सल्ला यावेळी मोदींनी कतारमधल्या उद्योगपतींना दिला. तुम्ही सर्वच भारताच्या क्षमतेला योग्यरीत्या जाणून आहात. गुंतवणुकीतले अडथळे दूर करण्याचा मी प्रयत्न करेन, असंही आश्वासनही मोदींनी कतारमधल्या उद्योगपतींना दिलं. यावेळी कृषी, सौरऊर्जा आणि रेल्वे आदी क्षेत्रात गुंतवणूक करण्याचं आवाहनही मोदींनी उद्योगपतींना केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोहातल्या मेडिकल कॅम्पमध्ये जाऊन भारतीय नोकरदारांची भेट घेतली. तेव्हा भारतीय नोकरदार हे प्रवासी असल्याची भावनाही मोदींनी व्यक्त केली.