अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्यावरील बंदी घालण्याचे राज्यांचे प्रयत्न अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडले आहेत. ट्रम्प यांना अभय देण्यात आले असून कोलोराडो कोर्टाच्या निर्णयावर स्टे आणला आहे. यामुळे ट्रम्प यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयानंतर ट्रम्प यांनी अमेरिकेसाठी मोठा विजय असल्याचे म्हटले आहे. कोलोराडोच्या न्यायालयाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ट्रम्प यांच्या निवडणूक लढण्यावर बंदी आणली होती. यासाठी अमेरिकेच्या संविधानाच्या १४ व्या सुधारणेचा हवाला दिला होता. सशस्त्र विद्रोह करणाऱ्यास राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्यास यानुसार प्रतिबंध आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने कोलोराडो कोर्टाला फटकारले आहे. आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन हा निर्णय दिल्याचे म्हटले आहे. तसेच १४ व्या सुधारणेमधील कलम तीन लागू करण्याचा अधिकार कोणत्याही कनिष्ठ न्यायालयांना नाही, असे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये ८ फेब्रुवारीला सुनावणी झाली होती. यामध्ये कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाकडे सर्वोच्च न्यायालयाने संशयाच्या दृष्टीने पाहिले होते.
सर्वोच्च न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांना मंगळवारी होणाऱ्या प्राथमिक टप्प्यातील निवडणुकीत भाग घेण्यास परवानगी दिली आहे. यामुळे पाच मार्चला ट्रम्प यांना रिपब्लिकन पार्टीकडून अधिकृतरित्या उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. 15 राज्यांमध्ये प्राइमरी निवडणूक होईल, मंगळवार असल्याने याला सुपर ट्युसडे म्हटले जात आहे. ट्रम्प हे त्यांच्या एकमेव प्रतिस्पर्धी निक्की हेली यांचा पराभव करून रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार होऊ शकतात.