नवी दिल्ली: तोशाखाना प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष प्रमुख इम्रान खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करत त्यांची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले. इम्रान खान सध्या सी श्रेणीतील तुरुंग समजल्या जाणाऱ्या अट्टक तुरुंगात आहेत.
इस्लामाबाद उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करत इम्रान खान यांची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले आहे. पीटीआयच्या वतीने हा संविधानाचा विजय असल्याचे म्हटले आहे. तोशाखाना प्रकरणात इम्रान खानला ३ वर्षांची शिक्षा झाली होती. याशिवाय निवडणूक आयोगाने त्यांच्यावर पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी घातली होती. तोशाखाना प्रकरणात दोषी ठरल्यानंतर इम्रान खानने ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
दरम्यान, इस्लामाबादमधील जिल्हा व सत्र न्यायालयाने इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर अटक करण्यात आली होती. सत्तेत असताना महागड्या सरकारी भेटवस्तू विकल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या निर्णयानंतर इम्रान खान यांना ५ वर्षे निवडणूक लढविता येणार नाही. तसेच, त्यांना एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला. दंड न भरल्यास त्यांना आणखी सहा महिने तुरुंगात ठेवण्यात येईल, असे न्यायाधीशांनी सांगितले होते. याचबरोबर, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (ECP) त्यांना दोषी ठरवल्यानंतर सार्वजनिक पदावर राहण्यास पाच वर्षांसाठी अपात्र देखील ठरवले होते.