मॉस्को - रशियानं नाटोसोबत युद्धजन्य स्थितीत यूरोपवर आण्विक हल्ल्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी रशियानं नौदलला विशेष आण्विक मिसाइल फायरिंगचं ट्रेनिंगही दिले आहे. हा खुलासा फायनान्शिअल टाईम्सच्या रिपोर्टमधून पुढे आला आहे. रशियाचं नौदल आण्विक हल्ल्यासाठी फ्रान्सच्या पश्चिमी तटावर आणि ब्रिटनपासून काही दूर टार्गेट निश्चित करत आहे. त्यासाठी खास नकाशा बनवण्यात आला असून हल्ल्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे.
या रिपोर्टमध्ये २९ गुप्त रशियन सैन्याच्या फाईलींचा हवाला देत म्हटलंय की, मॉस्कोनं नाटोसारख्या महासत्तेशी संघर्षाच्या सुरुवातीच्या काळात सामरिक अण्वस्त्रांचा वापराचा अभ्यास केला आहे. पश्चिम युरोपात मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्याचं रशियाचं प्लॅनिंग आहे. २००८ ते २०१४ यात तयार करण्यात आलेल्या या दस्तऐवजांमध्ये पारंपारिक किंवा सामरिक अण्वस्त्रे असलेल्या क्षेपणास्त्रांच्या टार्गेटचा उल्लेख आहे. अण्वस्त्रांच्या सुरुवातीच्या वापराची योजना यामध्ये लिहिलेली आहे. रशिया युद्धनौकांवर अण्वस्त्रे तैनात करू शकतो, असेही कागदपत्रांमध्ये लिहिले आहे. अशा तैनातीमुळे मोठा संघर्ष होण्याचा किंवा अपघात होण्याचा धोका देखील वाढतो असं फायनान्शिअल टाईम्सनं त्यांना मिळालेल्या कागदपत्रावरून रिपोर्टमध्ये दावा केला आहे.
शत्रूवर अण्वस्त्र हल्ल्याची परवानगी
शत्रूंवर वेगाने, अचानक त्याने हल्ला करण्यापूर्वी हल्ला केला जाऊ शकतो असं रिपोर्टमध्ये लिहिलं आहे. यात वेगवेगळ्या दिशांकडून मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र हल्ल्यांसाठी तयार राहण्यासही सांगण्यात आलं आहे.रशियाचं उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आण्विक शस्त्रे सामान्यतः विनाशाच्या इतर साधनांसह वापरण्यासाठी तयार केले आहे. कागदपत्रांची तपासणी करणाऱ्या विश्लेषकांना असं आढळून आले की, रशियन नौदलाच्या लांब पल्ल्याचा क्षेपणास्त्र धोका आणि रशियाच्या अण्वस्त्रांच्या वापरातील संभाव्य वाढ नाटो आढावा घेत असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
नाटोच्या ३२ ठिकाणी रशियाची नजर
कागदपत्रानुसार, रशियाची नाटोच्या ३२ ठिकाणांवर नजर आहे. जो नकाशा रशियन नौदलानं बनवला आहे त्यात युरोपमधील नाटोच्या ३२ सैन्य अड्ड्यांना टार्गेट केलेले दिसतंय. तर हा पूर्ण युरोपात टार्गेट केलेला छोटा भाग आहे. रशिया त्याहून मोठी तयारी करत आहे त्यात सैन्य आणि महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचा समावेश आहे असं स्टिमसन सेंटरमध्ये कार्यरत नाटोचे माजी अधिकारी विलियम अल्बर्क यांनी म्हटलं आहे.