कच्च्या तेलाच्या खरेदीवरून आधीच तणातणी असताना आता तुर्कीने मोठा पेच निर्माण केला आहे. एका कागदासाठी अडून बसल्याने तुर्कीच्या समुद्रात जहाजांच्या रांगा लागल्या आहेत. यात भारतासह अन्य देशांची २८ अजस्त्र मालवाहू जहाजे अडकली आहेत. ही जहाजे सोडणार नाही अशी भुमिका तुर्कीने घेतली आहे.
तुर्कीच्या मेरीटाईम अथॉरिटीने जहाजांची संख्या वाढू लागली असली तरी चेकिंग सुरुच ठेवणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे काळ्या समुद्रात कच्च्या तेलाची वाहतूक करणारी जहाजे अडकू लागली आहेत. जी-७ देशांनी रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी दराची सीमा ठरविली होती. याद्वारे रशियाकडून खरेदी केलेले कच्चे तेल हे ६० डॉलर प्रति बॅरल किंवा त्यापेक्षा कमी किंमतीत खरेदी केलेले असावे, असे आहे.
तुर्की नाटोचा सदस्य असल्याने तुर्कीने लगेचच यासंबंधीची कागदपत्रे आणि किंमत दर्शविणारी विम्याची कागदपत्रे असल्यासच आपल्या समुद्रातून जाऊ देण्याचा नियम जारी केला आहे. पुरेशी कागदपत्रे नसली तर आम्ही आमच्या समुद्रातून वाहतूक करू देणार नाही किंवा या जहाजांना ताब्यात घेण्याचे वक्तव्य केले आहे.
काळ्या समुद्रातील बॉस्फोरस सामुद्रधुनी ओलांडून भूमध्य समुद्रात प्रवेश करण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या मालवाहू जहाजांची संख्या गुरुवारी 16 वरून 19 वर पोहोचली. तसेच डार्डानेल्स सामुद्रधुनीमध्ये ९ कच्च्या तेलाची वाहतूक करणारी जहाजे आहेत. यात भारताचे एक दशलक्ष बॅरल कच्चे तेल असणारे एक जहाज आहे. हे टँकर २०० मीटरपेक्षाही अधिक लांबीचे आहेत. हे टँकर भारतासह दक्षिण कोरिया आणि पनामाला जात आहेत.