साओ पाओलो - एखाद्या हॉलीवूड चित्रपटाच्या कथानकाला शोभावं अशीच ही घटना आहे. दरोडेखोर केवळ तासाभराच्या अंतरावर होते, जर त्यांचा कट यशस्वी झाला असता तर हा जगातला बॅंकेवर टाकलेला सर्वात मोठा दरोडा ठरला असता. पण पोलीस अगदी वेळेवर पोहोचले आणि त्यांच्या कट-कारस्थानावर पाणी फेरण्यात पोलिसांना यश आलं व त्यांना ताब्यात घेतलं. घटना ब्राझीलमध्ये घडली आहे.
दरोडेखोर चार महिन्यांपासून हा कट आखत होते. ब्राझीलमधल्या साओ पाओलो येथील बॅंक लुटण्याचा दरोडेखोरांचा प्लॅन होता. विशेष म्हणजे या दरोड्यासाठी त्यांनी 4 कोटी रियाल म्हणजे 1.27 मिलियन डॉलर ( 8. 26 कोटी ) रूपये स्वतः गुंतवले होते. यासाठी 16 दरोडेखोर 4 महिन्यांपासून तयारी करत होते. दरोड्यासाठी त्यांनी एक घर भाड्याने घेतलं. या घरातूनच त्यांनी एक भुयार खोदण्यास सुरूवात केली. 600 मीटर लांब भुयार त्यांनी बनवला. या भुयारातून बॅंकेच्या लॉकरपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा कट होता. भुयारात प्रकाशा यावा यासाठी बल्बची देखील व्यवस्था त्यांनी केली होती. याशिवाय माती पडून भुयार ब्लॉक होऊ नये यासाठी त्यांनी लोखंडाचाही सपोर्ट दिला.
पण ऐनवेळी पोलिसांना दरोडेखोरांच्या कटाची कुणकुण लागली आणि दरोडा टाकण्यापासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर असतानाच पोलिसांनी त्यांचा कट उधळला. बॅंकेतून तब्बल 317 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास दोन हजार कोटी रूपये लुटण्याचा त्यांचा डाव होता. जर हा दरोडा टाकण्यात त्यांना यश आलं असतं तर तो जगातला बॅंकेवर टाकलेला सर्वात मोठा ठरला असता असं सांगितलं जात आहे.