अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोरोनातून बरे व्हावे म्हणून उपोषण करणारा तेलंगणातील शेतकरी बुसा क्रिष्णा राजू याचं कार्डियाक अरेस्टने निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर राजूने गेल्या काही दिवसांपासून अन्नत्याग केला होता, अनेक दिवस तो झोपला नव्हता. सतत ट्रम्प बरे व्हावे ही प्रार्थना तो करता होता. पण त्याचा यादरम्यान जीव गेला.
ANI ला त्याच्या सहकाऱ्याने सांगितले की, 'राजूने गेल्यावर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ६ फूटाचा पुतळा उभारला होता. या पुतळ्याची तो सतत पूजा करत होता'. राजूने डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाढदिवशी म्हणजे गेल्यावर्षी १४ जूनला त्यांचा एक पुतळा तयार केला होता. राजूला हे माहीत होतं की, २४ फेब्रुवारीला ट्रम्प भारतात दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे तो फार आनंदी होता. इतकेच नाही तर राजू ट्रम्प यांचा फोटो नेहमी सोबत ठेवत होता. (CoronaVirus News : कोरोना संसर्गानंतर डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतले अन् म्हणाले...)
त्याने पुढे सांगितले की, 'डोनाल्ड ट्रम्प हे कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर राजू फार दु:खी झाला होता. अनेक रात्री तो झोपला नाही, जेवला नाही. तो सतत ते बरे व्हावे म्हणून प्रार्थना करत होता. हे सगळं तो गेल्या चार ते पाच दिवसांपासून करत होता'. राजूचं निधन रविवारी दुपारी कार्डियाक अरेस्टमुळे झालं. राजू हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा डाय हार्ड फॅन होता. (कोरोना संसर्गानंतर डोनाल्ड ट्रम्प हॉस्पिटलबाहेर; नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तज्ज्ञांची टीका)
दरम्यान, ऑक्टोबर १ ला डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प दोघेही कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची बातमी आली. नुकतेच ट्रम्प हे कोरोनातून बरे होऊन व्हाईट हाऊसमध्ये परतले. नुकतीच त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली. आता ते अमेरिकेतील निवडणुकांच्या कॅम्पेनमध्ये सहभागी होण्याची तयारी करत आहेत. यावर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.
परतल्यावर ट्रम्प काय म्हणाले?
आता अमेरिकेतील वॉल्डर रीड मेडिकल सेंटरमध्ये उपचार घेतल्यानंतर ट्रम्प पुन्हा एकदा व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाले आहेत. ट्रम्प यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. तसेच "माझी तब्येत आता उत्तम आहे. कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. कोरोना व्हायरसला तुमच्या जीवनावर वरचढ होऊ देऊ नका" असं देखील ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प अद्यापही कोरोनामधून पूर्णपणे बरे झालेले नाहीत. मात्र त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना आता व्हाईट हाऊसमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार ट्रम्प हे संध्याकाळी 6 वाजता वॉल्टर रीड मेडिकल सेंटरमधून पुन्हा एकदा व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाले. पण ट्रम्प अद्यापही कोरोनातून पूर्णपणे बरे झाले नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मात्र तब्येतीत काही सुधारणांमुळे त्यांना व्हाईट हाऊसमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
"कोरोना व्हायरसला घाबरण्याची गरज नाही"
"माझी तब्येत आता उत्तम आहे. कोरोना व्हायरसला घाबरण्याची गरज नाही. कोरोनाला तुमच्या जीवनावर वरचढ होऊ देऊ नका. आम्ही आमच्या कार्यकाळादरम्यान काही चांगली औषधं आणि माहिती विकसित केली आहे. मला 20 वर्षांपूर्वी जसं वाटायचं त्यापेक्षाही उत्तम आता वाटत आहे" असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांची ऑक्सिजन पातळीही सामान्य आहे. त्यांना रेमडेसिवीरचा पाचवा डोस हा व्हाईट हाऊसमध्ये दिला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.