न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन या महिन्यात भारत दौऱ्यावर येत असून, ते लखनौ व जयपूरला भेट देणार आहेत. जागतिक आरोग्य, औषधांची सुविधा, हवामान बदल व आर्थिक विकास यासारख्या महत्त्वाच्या विषयाकडे ते लक्ष वेधतील. क्लिंटन भारताबरोबरच व्हिएतनाम, इंडोनेशिया, पापुआ न्यू गिनी व आॅस्ट्रेलिया यांना १६ जुलै ते २३ जुलै या कालावधीत भेट देतील. त्यांच्या क्लिंटन फौंडेशनतर्फे या पाच देशांत सामाजिक विषयावर जागृती करण्यासाठी हा दौरा आहे. १६ जुलै रोजी ते जयपूरला भेट देतील व तिथे दहा लाख मुलांना दररोज जेवण देणाऱ्या स्वयंपाकघराला भेट देतील. एनजीओ अक्षयपात्र व देशपांडे फौंडेशन यांनी ही भेट आयोजित केली आहे. लखनौ येथे ते एक शाळा व कम्युनिटी सेंटरला भेट देतील. (वृत्तसंस्था) अध्यक्षीय कारकीर्द संपल्यानंतर क्लिंटन यांनी अशिया- पॅसिफिक विभाग हे आपले कार्यक्षेत्र ठरविले आहे. क्लिंटन आरोग्य संस्थेकडून जीवनरक्षक औषधे पुरविणे व हवामान बदलाची माहिती देणे हे कार्य ते पार पाडत आहेत.
बिल क्लिंटन येणार भारत दौऱ्यावर
By admin | Published: July 05, 2014 5:15 AM