जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. जगभरात कोरोना लसीवर युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. याच दरम्यान मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या बिल गेट्स यांनी कोरोनाबाबत भीती व्यक्त केली असून गंभीर इशारा दिला आहे.
बिल गेट्स यांना पुढील चार ते सहा महिन्यांमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढणार असून परिस्थिती अधिक चिंताजनक होईल अशी भीती व्यक्त केली आहे. गेट्स यांची 'बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन' ही संस्था कोरोनावरील लस विकसित करण्यासाठी आणि ती जगभरामध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी सध्या काम करत आहे. अमेरिकेसारखा प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाला आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अमेरिकेमधील कोरोनाची परिस्थिती पाहून गेट्स यांनी हा इशारा दिला आहे.
"कोरोनामुळे दोन लाखांहून अधिक जणांचा होऊ शकतो मृत्यू"
बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या बिल गेट्स यांनी सीएनएनला एक विशेष मुलाखत दिली. यामध्ये बिल गेट्स यांनी "पुढील चार ते सहा महिने कोरोनामुळे परिस्थिती अत्यंत वाईट होऊ शकते. आयएचएमआय (इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अँड एवेल्यूएशन) च्या अंदाजानुसार या कालावधीमध्ये कोरोनामुळे दोन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू होऊ शकतो. मास्क लावण्यासारख्या इतर नियमांचं पालन केल्या मृत्यूचा हा आकडा कमी होऊ शकतो" असं म्हटलं आहे.
जगभरात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू हे अमेरिकेमध्ये झाले आहेत. तसेच महासत्ता असणाऱ्या या देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, "जेव्हा मी 2015 मध्ये भविष्यावाणी केली होती तेव्हा मी मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक असण्यासंदर्भात भाष्य केलं होतं. त्यामुळेच हा व्हायरस सध्या जितका घातक आहे त्याहून तो अधिक घातक आणि जीवघेणा होऊ शकतो. अजून आपण या साथीमधला अत्यंत वाईट काळ पाहिलेला नाही. मला सर्वाधिक आश्चर्य हे अमेरिका आणि जगभरातील देशांवर पडलेल्या आर्थिक प्रभावासंदर्भात वाटते. मी जो अंदाज पाच वर्षांपूर्वी व्यक्त केला होता. त्यापेक्षा अनेक पटींनी अधिक परिणाम अर्थव्यवस्थांवर झाला" असंही बिल गेट्स यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.