न्यूयॉर्क - जगभरात हाहाकार घालणाऱ्या कोरोना व्हायरसने आतापर्यंत हजारो बळी घेतले आहेत. याचा सर्वाधिक फटका इटली, स्पेन आणि अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत सर्वाधिक कोरोना बाधित आढळून आले आहेत. जगातील जवळपास सर्वच बलाढ्य देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. असे असतानाच, आता जगातील सर्वात् श्रीमंत लोकांपैकी एक असलेले बिल गेट्स कोरोना व्हायरसवरील लस तयार करण्यासाठी अब्जावधी डॉलर खर्च करणार आहेत.
"द डेली शो"च्या होस्ट नूह यांना दिलेल्या एका मुलाखतीत गेट्स यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, कोरोना व्हायरसच्या एकूण सात व्हॅक्सीन तयार केल्या जाणार आहेत आणि त्यातील दोन सर्वात चांगल्या व्हॅक्सीनचा प्रयोग केला जाणार आहे.
बिल गेट्स म्हणाले, आम्ही कोरोना व्हायरसवरील 7 व्हॅक्सीन तयार करत असलेल्या सर्व कंपन्यांना निधी देत आहोत. या सातही वॅक्सीन एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी तयार करण्याचे काम सुरू आहे. वेळेची बचत व्हावी हा यामागचा मुख्य हेतू आहे. व्हॅक्सीन तयार होताच त्यातील दो सर्वोत्कृष्ट व्हॅक्सीन्सची निवडकरून त्याचे प्रयोग केले जातील. यापूर्वीही गेट्स यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे.
जगभरात ४० हजार जणांची प्रकृती चिंताजनक -जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 64,754 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 12,03,459 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. यापैकी जवळपास ४० हजार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आतापर्यंत कोरोना झालेले 2,46,803 लोक बरे झाल्याचेही समजते.
अमेरिकेतील रुग्णांचा आकडा 3 लाखवर -कोरोना विषाणूमुळे झालेल्या प्रादुर्भावाने अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक म्हणजेच 3 लाखांहून अधिक रुग्ण असून चिंतेची बाब म्हणजे गेल्या 24 तासांत तिथे 13 हजारांहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 7 हजार 900 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे आणि त्यात 450 जणांचा गेल्या 24 तासांत मृत्यू झाला आहे.
ब्रिटनममध्ये एकाच दिवसात 708 जणांचा मृत्यू -ब्रिटनमध्ये शनिवारी (5 एप्रिल) एकाच दिवसात कोरोना व्हायरसमुळे 708 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. तर कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 40 हजारांहून अधिक झाला आहे. तेथे आतापर्यंत 4313 लोकांचा मृत्यू झाला आहे.
सर्वाधिक मृत्यू इटली आणि स्पेनमध्ये -अमेरिकेखालोखाल कोरोनाने ज्या देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे, त्यापैकी बहुतांश देश युरोपातील आहेत. आतापर्यंत इटलीमध्ये 14 हजार 700 तर स्पेनमध्ये 11 हजार 800 लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. फ्रान्समध्ये 7,560, ब्रिटन 4,313, इराण 3,452, जर्मनी 1,444, नेदरलँड 1,650 तर बेल्जीयममध्ये 1,300 जणांचा मृत्यू झाला आहे.