कोरोनाच्या सुरुवातीला कोणीच त्याला फारसं गांभीर्यानं घेतलं नाही; पण जगभरात ज्या वेगानं आणि ज्या तीव्रतेनं तो आपले हातपाय पसरायला लागला, त्यावेळी सारं जगच भयचकित झालं आणि कोलमडून पडलं. कोरोनाच्या फटक्यातून अजूनही अनेक देश सावरलेले नाहीत. उलट दुसऱ्या लाटेमुळे जगभरात भीती वाढली आहे. कोरोनाची लस आली, हा त्यातला एक दिलासा. या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक, बिल ॲण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे अध्यक्ष, तसेच जगातील सर्वाधिक श्रीमंतांपैकी एक आणि दानशूर बिल गेट्स म्हणतात, २०२२ च्या अखेरपर्यंत जग कोराेनाच्या महामारीतून पूर्णपणे मुक्त होईल आणि परत मूळ पदावर (नॉर्मल) येईल.
पोलंडचे वृत्तपत्र गॅझेटा वायबोर्झा आणि टीव्हीएन २४ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दोनच दिवसांपूर्वी हा आशावाद व्यक्त केला आहे.गेट्स यांचं म्हणणं आहे, कोरोना महामारी म्हणजे जगातील अविश्वसनीय शोकांतिका आहे. या काळात अख्खं जग देशोधडीला लागलं. कोरोनानं सर्वसामान्यांच्या जीवनात शिरकाव केल्यापासून आतापर्यंत केवळ एकच गोष्ट चांगली घडली आहे, ती म्हणजे कोरोनाची लस आता उपलब्ध झाली आहे. या लसीमुळे लोक आता लवकरात लवकर कोरोनामुक्त होतील. का आणि कशावरून गेट्स हा आशावाद व्यक्त करतात? एकतर अनेक लस-संशोधनाच्या कार्यांत त्यांचा सुरुवातीपासूनच हातभार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानावर त्यांचा प्रचंड विश्वास आहे. ते स्वत: त्याचे जाणकार आहेत आणि नवनवीन तंत्रज्ञान समजून घेण्यात, त्या माध्यमातून लोकांचे, जगाचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी कायम पुढाकार घेतला आहे. त्यासाठी आतापर्यंत अब्जावधी डॉलर्सच्या देणग्याही त्यांनी जगाला दिल्या आहेत.
कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनीही पुढाकार घेतला असून, आपल्या बिल ॲण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या माध्यमातून तब्बल १.७५ बिलियन अमेरिकन डॉलर्स ते खर्च करणार आहेत. जगात कोरोनाची लस बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, त्यांना आर्थिक सहाय्य करतानाच कोरोनाचे रुग्ण शोधून काढणे आणि त्यांच्यावर अत्याधुनिक उपचार करणे इत्यादि कार्यांसाठी ते हा निधी वापरणार आहेत. गरज पडल्यास आणखीही निधी उपलब्ध करून देण्याची त्यांची तयारी आहे. जागतिक आरोग्य परिषद आणि ‘ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन्स ॲण्ड इम्युनायझेशन (GAVI) यांच्या सहकार्यानं कोरोना लस बनवण्यातही गेट्स यांनी पुढाकार घेतला आहे. २०२१ च्या अखेरपर्यंत जगातील गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांसाठी किमान कोरोना लसीचे दोन बिलियन डोस उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. आजच्या घडीला जगभरात जवळपास तेरा कोटी कोरोनाचे रुग्ण आहेत. सुमारे २८ लाख लोकांना काेरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर दहा कोटीहून अधिक रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
अमेरिकेत कोरोनानं सर्वाधिक हाहाकार घडवला. तिथे तीन कोटीपेक्षाही अधिक रुग्ण सापडले. त्यानंतर १.२२ कोटी रुग्णांसह ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर तर १.१७ कोटी रुग्णांसह भारत तिसऱ्या क्रमांकावर होता. अर्थात असं असलं तरी भारतात लस निर्मितीवरही प्रामुख्यानं लक्ष दिलं गेलं आणि दोन लसींना मान्यता देण्यात आली. त्यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण चालू आहे. त्याचा परिणाम कोरोना झपाट्यानं कमी करण्यात होईल. कोरोना हटवण्यात भारतानं केलेल्या प्रयत्नांचीही बिल गेट्स यांनी प्रशंसा केली आहे. वैज्ञानिक नवनिर्मितीत भारतानं आणि भारताच्या नेर्तृत्वानं चांगला पुढाकार घेतला. काेरोना हा साथीचा रोग आटोक्यात आणण्यासाठी भारतानं भरीव अशी कामगिरी केली, भारताने लवकरात लवकर केवळ लस निर्माण केली नाही, तर इतर देशांनाही त्याचा पुरवठा करून त्यांना आश्वस्त केले. ही फार मोठी गोष्ट आहे, या शब्दांत बिल गेट्स यांनी भारताचे कौतुक केले. ट्विटरवर बिल गेट्स म्हणतात, कोविडची साथ आटोक्यात आणण्यासाठी भारताने जागतिक पातळीवर काम करताना वैज्ञानिक नेतृत्वाला प्रोत्साहन दिलं आणि लस उत्पादक क्षमतेतही वाढ केली. अर्थात बिल गेट्स यांनी भारताचं कौतुक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी बऱ्याचदा भारताच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे.
बिल गेट्स आणि त्यांच्या फाउंडेशननं जगात जिथे जिथे मदतीची गरज भासली तिथे तिथे प्रत्यक्ष जाऊन मदत केली आहे. विशेषत: त्या त्या देशांचं सरकार आणि स्वयंसेवी संस्था जिथे पोहोचल्या नाहीत, तिथे जाऊन गेट्स यांनी लोकांचे प्रश्न सोडवण्यात पुढाकार घेतला. एड्स निर्मूलन, आधुनिक शेती, अल्पसंख्याक समुदायासाठी स्कॉलरशिप्स, विकसनशील देशात पसरलेल्या रोगांचं निर्मूलन, तसेच इतरही अनेक कारणांसाठी त्यांनी आपला निधी वापरला आहे.
दानशूर, पारदर्शी आणि प्रभावशाली!बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा यांनी सन २००० मध्ये बिल ॲण्ड मिलिंडा गेट्स फाउंडेशन या सेवाभावी संस्थेची स्थापना केली. जगातील ही सर्वाधिक पारदर्शी संस्था मानली जाते. आपला पैसा कुठे, कसा, किती खर्च केला जातो, याची माहितीही ते जनतेला देतात. डेविड रॉकफेलर या दानशूर उद्योगपतीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव आहे.