वॉशिंग्टन : जगभर ओमायक्रॉन विषाणूच्या चिंताजनक वाढीच्या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेटस् यांनी लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. गेट्स यांनी मंगळवारी ट्विटद्वारे हा इशारा देताना मीदेखील माझ्या सुट्यांच्या अनेक योजना रद्द केल्याचे म्हटले.
अशात कोविडला टाळण्यासाठीचे खबरदारीचे उपाय किती महत्त्वाचे आहेत यावर गेट्स यांनी भर दिला. मास्क वापरणे, बंदिस्त ठिकाणीही खूप मोठी गर्दी टाळणे आणि लस टोचून घेणे याची आठवण करून देऊन त्यांनी पूरक मात्रा (बूस्टर डोस) हे चांगले संरक्षण असल्याचे म्हटले.
शियान शहरात लॉकडाऊन
बीजिंग : चीनने उत्तरेकडील शियान शहरात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत चालल्यामुळे बुधवारी लॉकडाऊन लागू केला आहे. देशात हिवाळी ऑलिंपिक खेळांच्या स्पर्धा काहीच आठवड्यांवर आल्या असताना लॉकडाऊन लागू केले आहे.
कोरोनाचे ६,३१७ रुग्ण
नवी दिल्ली : देशात बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ६,३१७ रुग्ण आढळले, तर ३१८ जणांचा मृत्यू झाला. देशात कोरोना विषाणूमुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या आता ४,७८,३२५ झाली आहे.
इस्रायलने दिला चौथा डोस
तेल अविव : ६० वर्षांहून अधिक वय असलेले वैद्यकीय कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांना इस्रायलने कोरोना लसीचा चौथा डोस देण्यास सुरुवात झाली आहे. ओमायक्रॉनच्या संसर्गामुळे ही दक्षता घेण्यात येत आहे. तिसरा डोस घेऊन चार महिने झालेल्यांनाच चौथा डोस दिला जात आहे. फायझर व बायोएनटेक या कंपन्यांनी बनविलेल्या लसी इस्रायलमध्ये देण्यात येतात.