तिरडीवरचा माणूस आगीचे चटके लागल्याबरोबर उठून बसला किंवा मृत समजून शवागारात ठेवलेला मृतदेह ‘चालत बाहेर आला..’, अशा बातम्या आपण अनेकदा वाचतो, ऐकतो, त्याचं काही वेळा आपल्याला हसू येतं, तर काही वेळा, ‘व्यवस्थेच्या’ निष्काळजीपणानं आपण व्यथितही होतो.. पण एक महिला पाऊण तासानंतर ‘जिवंत’ झाल्याची एक खळबळजनक घटना नुकतीच घडली आहे. एखाद्दुसऱ्या डॉक्टरानं नव्हे, तर अत्यंत निष्णात अशा डॉक्टरांच्या टीमनं ती ‘मृत’ झाल्याची खात्री करून घेतल्यानंतरही त्यांच्याचसमोर या महिलेच्या कुडीत प्राण फुंकले गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या घटनेत महिलेची ‘जगण्याची’तीव्र इच्छाशक्ती जशी दिसून येते, तशीच डॉक्टरांनीही आशा न सोडता अथक प्रयत्न केल्याची दुर्मीळ चिकाटीही दिसून येते.अमेरिकेच्या मेरीलॅण्ड येथील कॅथी पॅटन ही एक मध्यमवयीन महिला. आपल्या आरोग्याची आणि आरोग्यशैलीचीही चांगली काळजी घेणारी. काही दिवसांपूर्वीचीच घटना. आपल्या नेहमीच्या रुटिनप्रमाणे गोल्फ क्लबवर ती गोल्फ खेळत होती. तेवढ्यात तिला तिची मुलगी स्टेसी फिफरचा फोन आला.. मला लेबर पेन्स होताहेत आणि मी आत्ता हॉस्पिटलमध्ये आहे. लवकर ये. हे ऐकताच कॅथीनं गोल्फ खेळणं सोडलं आणि घाईघाईनं हॉस्पिटल गाठलं. पण आठव्यांदा आजी होऊ पाहणाऱ्या कॅथीला हॉस्पिटलमध्ये पाेहोचताच हार्ट ॲटॅक आला. तिथल्या डॉक्टरांनी लगेच तिला तपासलं. तिची नाडी लागत नव्हती, हृदयाचे ठोके थांबले होते, ऑक्सिजन मेंदूपर्यंत पोहोचत नव्हता. ब्लड प्रेशरची नोंद होत नव्हती. तिचा मृत्यू झाला आहे, हे उघडच दिसत होतं. कोणत्याही डॉक्टरला त्याविषयी किंचितही शंका नव्हती, पण तरीही त्यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले. कॅथीची मुलगी स्टेसीनंही ती स्वत: लेबर रूममध्ये असतानाही आईवर उपचार सुरू ठेवण्याची विनंती डॉक्टरांना केली. डॉक्टरांनीही प्रयत्नांची पराकाष्ठा करीत कॅथीवर उपचार सुरूच ठेवले. तिला ‘सीपीआर’ (कार्डिओ पल्मनरी रिससीटेशन) देणं थांबवलं नाही. कोणाही व्यक्तीला हार्ट ॲटॅक आल्यानंतर तातडीचा प्राथमिक उपाय म्हणून त्या व्यक्तीला ‘सीपीआर’ दिला जातो. यामुळे आजवर हजारो जीव वाचले आहेत. कॅथी तब्बल पाऊण तास म्हणजे ४५ मिनिटे या अवस्थेत होती... सगळं काही संपलंय असं वाटत असतानाच अचानक कॅथीच्या हृदयाची धडधड सुरू झाली. कॅथी ‘जिवंत’ झाली! पुन्हा श्वास घेऊ लागली, त्याच्या केवळ एक मिनिट आधीच तिच्या मुलीनं, स्टेसीनंही बाळाला जन्म दिला होता! एक जीव नव्यानं या जगात आला होता, तर एक जीव या जगातून जाता जाता अचानक थांबला होता! कॅथीवर उपचार करणारे डॉ. डोव्ह फ्रँकेल म्हणतात, ही घटना म्हणजे कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. कॅथी ‘क्लिनिकली डेड’ झाली असली, तरी तब्बल पाऊण तासानं ती पुन्हा माणसांत येणं.. अशा प्रकारची घटना माझ्या उभ्या आयुष्यात मी पाहिली नाही, ऐकली नाही. कॅथी ज्या प्रसंगातून गेली, त्यानंतर तिला मी ‘वेलकम’ म्हणणार नाही, परमेश्वराचे आभार मानताना त्याला ‘थँक यू’ म्हणेन! ‘पुन्हा’ शुद्धीत आल्यानंतर आपल्याबाबत काय घडलं होतं, हे कळल्यावर कॅथीलाही आश्चर्याचा धक्का बसला. कॅथी म्हणते, मी जिवंत राहावं अशी कदाचित ईश्वराचीच इच्छा असावी. या जगत्नियंत्याचे आभार कसे मानावेत हेच मला कळत नाही. परमेश्वरा, मी तुझ्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही आणि मला कधी होताही येणार नाही. मला मिळालेलं दुसरं आयुष्य मी इतरांच्या सेवेसाठीच समर्पित करेन.कॅथीच्या मुलीनं; स्टेसीनं नवीनच जन्माला आलेल्या आपल्या मुलीचं नाव अलोरा ठेवलं आहे. स्टेसी म्हणते, माझी आई माझ्या आणि माझ्या मुलीच्या जवळ असावी, हीच परमेश्वराची इच्छा असावी. अलोरानं जन्म घेतला आणि लगेच माझी आई परत आली. कदाचित माझ्या मुलीनंच तिला हाक मारून पुन्हा बोलवून घेतलं असावं.. नातीच्या भेटीच्या ओढीनंच ती परत आली, यावर कॅथीसह स्टेसी आणि इतरांचाही विश्वास आहे. आपल्या नातीला डोळे भरून पाहताना आणि तिला हातात घेताना, कॅथीचे आनंदाश्रू तिच्या डोळ्यांत मावत नव्हते. आपली नात हीच आपली ‘जन्मदाती’ आहे, तिनंच आपल्याला पुनर्जन्म दिला, असं तिला वाटत होतं..
महिलांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण जास्तमहिला आणि पुरुषांच्या हार्ट ॲटॅकबद्दल दोन वर्षांपूर्वी अमेरिकेत झालेलं संशोधन सांगतं, अलीकडच्या काळात पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हार्ट ॲटॅकचं प्रमाण वाढलं आहे. त्या अगोदर मात्र पुरुष मोठ्या प्रमाणात हार्ट ॲटॅकला सामोरे जात होते आणि त्यात त्यांचा मृत्यू होण्याचं प्रमाणही बरंच मोठं होतं. प्रत्यक्ष आकडेवारीही तेच दाखवत होती. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, १९८७ पूर्वी हार्ट ॲटॅक येण्यात महिलांपेक्षा पुरुषांचं प्रमाण अधिक होतं. २०१७ पर्यंत हे प्रमाण समान पातळीवर आलं आणि त्यानंतर महिलांमधील हृदयविकाराचं प्रमाण वाढलं. अमेरिकेत हार्ट ॲटॅकमुळे दर मिनिटाला एक महिला मृत्युमुखी पडते, असं त्यांचं निरीक्षण आहे. अनेक महिला पहिल्या ॲटॅकमध्येच दगावतात, पुरुष मात्र दोन-तीन ॲटॅक येऊनही तग धरतात, असंही पाहणीत लक्षात आलं आहे.