तोक्यो : सहा वर्षांच्या अथक संशोधनानंतर जपानी वैज्ञानिकांना कृत्रिम गर्भधारणेतून पेंग्विन पक्ष्याचे पहिले पिल्लू जन्माला घालण्यात यश आले आहे. पेंग्विनचे कृत्रिम प्रजनन करण्याचा हा पहिलाच यशस्वी प्रयोग आहे.ओसाका शहरातील कैईकान मत्स्यालयात हे प्रयोग केले गेले. यातून ‘सदर्न रॉक हॉपर’ प्रजातीच्या पेंग्विनचे पिल्लू महिनाभरापूर्वी जन्माला आले. मत्स्यालयातील कर्मचारी तेव्हापासून त्या पिल्लाचे दररोज वजन करत आहेत. जन्माच्या वेळी ४८.२ ग्रॅम वजन असलेले पिल्लू आता एक किलो २१० ग्रॅम वजनाचे झाले आहे. ही वाढ अपेक्षेहून व पेंग्विनच्या नैसर्गिक वाढीहूनही जास्त असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.कोबे विद्यापीठाच्या कृषिविज्ञान विभागातील सहप्राध्यापक कुसुनोकी हिरोशी यांच्या मदत व मार्गदर्शनाने ओसाका मत्स्यालयाच्या वैज्ञानिकांनी हे कृत्रिम प्रजनन केले. यासाठी या प्रजातीची नैसर्गिक प्रजोत्पत्ती कशी होते याचा सखोल अभ्यास केला गेला. नंतर तोक्यो सी लाईफ पार्कच्या मदतीने या प्रजातीच्या सुदृढ पुरुष पेन्ग्विनचे शुक्राणु मिळवून त्यातून हे पिल्लू जन्माला घालण्यात आले. (वृत्तसंस्था)‘सदर्न रॉक हॉपर’ प्रजातीचे पेंग्विन अंटार्क्टिकाजवळ फॉकलंडसह इतर बेटांवर आढळतात. ही प्रजाती विनष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने आंतरराष्ट्रीय निसर्गरक्षण संघटनेने त्यांचा समावेश लाल यादीत केला आहे.
कृत्रिम गर्भधारणेतून पेंग्विनचा जन्म
By admin | Published: July 08, 2016 1:13 AM