इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन शेजारी देशांमधल्या वैराचा इतिहास फार रक्तरंजित आणि वर्तमान तर सतत विस्तवावर ठेवलेल्या उकळत्या तेलाच्या कढईसारखाच! पॅलेस्टाईनच्या पोटातून जन्माला आलेल्या इस्रायलचं अस्तित्व ना शेजारी देशाने कधी मानलं, ना इस्रायलच्या उर्मट, आक्रस्ताळ्या वर्तनात काही फरक पडला. एकाच आईच्या पोटी जन्माला आलेल्या दोन लेकरांनी जन्मभर उभा दावा मांडून एकमेकांचं रक्त काढत बसावं, तशी या दोन देशांची अवस्था आहे. काही दिवसांपूर्वीच या दोन्ही देशांत झालेल्या युद्धाची धग अजूनही शांत झालेली नाही. हम्मास या अतिरेकी संघटनेचे हल्ले आणि इस्राली सैनिकांनी त्याला दिलेलं प्रत्युत्तर यामुळे गाझा पट्टी तर दिवसरात्र धुमसत असते.
- पण, एक मात्र आहे! दोन्ही देशांतल्या सामान्य नागरिकांमध्ये असलेलं परस्पर प्रेम! भारत-पाकिस्तान या दोन शेजारी देशांमध्ये राजकीय ‘वैर’ कायम असलं, तरी दोन्ही देशांमधील लोकांची दोस्ती तशी पुरानी आहे. दोन्ही देशांतील लोक एकमेकांचा आदरही करीत असतात. त्याच न्यायाने इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांचा ‘याराना’ अतिशय गहिरा. देशांच्या सीमा शत्रुत्वाच्या वणव्याने पेटलेल्या असल्या, तरी सामान्य माणसांमधलं प्रेमाचं नातं हे शत्रुत्व ओलांडून जातं, याची प्रचिती देणारी एक हृदयद्रावक घटना नुकतीच इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या नागरिकांदरम्यान घडली.
इडिट हॅरेल सेगल ही उत्तर इस्रायलच्या एश्शार या भागात राहणारी ५० वर्षांची ज्यू महिला. ती लहान मुलांच्या शाळेत शिकवते. दोन देशांच्या दुश्मनीतून सर्वसामान्य नागरिकांना काय त्रास होऊ शकतो, याचा अनुभव तिच्याही कुुटुंबानं घेतला आहे. हिटलरनं ज्या काळात ज्यू लोकांना किड्यामुंग्यांसारखं मारलं त्या वेळी इडिटचे आजोबाही छळछावणीत होते. तिथून जिवंतपणी परत आलेले जे थोडे भाग्यवान होते, त्यापैकी तिचे आजोबा एक. त्यांच्या आठवणी इडिटच्या मनात कायम जाग्या होत्या. तिच्या आजोबांनी एवढे हाल सोसले, पण त्यांचं रूपांतर ‘कट्टर देशाभिमान्यात’ कधीच झालं नाही. इडिट लहान असताना ते तिला नेहमी सांगत असत, आपलं आयुष्य अर्थपूर्ण असलं पाहिजे. कोणाला दु:ख देणं, त्रास देणं किंवा मारणं यापेक्षा एखाद्याचा प्राण वाचवणं हे सर्वश्रेष्ठ मानवी कर्तव्य आहे.. इडिटच्या मनात आजोबांचे हे शब्द कोरले गेले होते. आपलंही जीवन कोणाच्या तरी कारणी लागावं, ही सुप्त इच्छा तिच्या मनात कायम होती.
तशी संधी काही दिवसांपूर्वीच तिच्याकडे चालून आली आणि मागचापुढचा विचार न करता तीन वर्षांच्या लहानग्या मुलाला तिनं आपली किडनी दान केली! हा मुलगा होता पॅलेस्टाईनचा! कट्टर दुश्मन असलेल्या शेजारी देशाचा! आपल्या या कृतीनं खळबळ माजेल, घरचे आपल्या विरोधात जातील, हे तिला माहीत होतं, तरीही तिनं हा निर्णय घेतला. आणि झालंही तसंच, इडिटचा नवरा, मुलं, आई, वडील.. सगळ्यांनी तिच्या या निर्णयाला प्रचंड विरोध केला; पण आपण कशासाठी हे करतो आहोत, हे तिला पक्कं माहीत होतं. कोणतेही देश एकमेकांचे कितीही वैरी असले तरी मानवतेच्या कारणांवरून काही वेळा सूट दिली जाते. भारतात जसं अनेक पाकिस्तानी नागरिक वैद्यकीय उपचारांसाठी येतात, तसंच इस्रायलनंही पॅलेस्टाईनच्या मर्यादित लोकांना वैद्यकीय कारणांसाठी प्रवेश खुला ठेवला आहे. त्याचाच फायदा घेऊन गाझा पट्टीतील मुलाचं हे कुटुंब त्याला उपचारासाठी इस्रायलमध्ये घेऊन आलं होतं. त्याच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या होत्या. कोणाची किडनी मिळाली तरच तो जगू शकणार होता. त्याच्या कुटुंबातील कोणाचीही किडनी त्याला जुळू शकत नव्हती.
दवाखान्यात भरती झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं, किडनीसाठी तर आमच्या देशातही प्रचंड रांग आहे, पण तुमच्याकडील कोणी कोणत्याही इस्रायली व्यक्तीला किडनी दान केली, तर यादीत तुमचा क्रमांक खूप वर येईल. तुमच्या मुलाला किडनी मिळू शकेल.. मुलाच्या वडिलांनीही मग कोणताही विचार न करता आपली किडनी दान करण्याची तयारी दर्शवली. इस्रायलमधील दोन मुलांची आई असलेल्या एका २५ वर्षीय महिलेला त्यांची किडनी बसविण्यात आली. त्याच दिवशी त्यांच्याही मुलाला किडनी मिळण्याची व्यवस्था झाली. ही किडनी होती इडिटची!
‘त्या मुलालाही आयुष्य जगायचं होतं!’ इडिटनं आपली किडनी दान केल्यानंतर हिब्रू भाषेत त्या मुलाला एक हृदयद्रावक पत्र लिहिलं. एका मित्राकडून अरेबिक भाषेत त्याचं भाषांतर करून घेतलं. त्यात म्हटलं होतं, एका जीवाभावाच्या नात्यानं आता आपण कायमचे जोडले जाणार आहोत!.. त्या कुटुंबाच्या डोळ्यांतूनही पाणी आलं. जगातील सर्वांत जटिल संघर्ष मानल्या जाणाऱ्या दोन देशांतील नागरिकांमध्ये नवे दुवे स्थापित झाले. ज्या दिवशी इडिटनं आपली किडनी दान केली, त्याच दिवशी अखेर तिचं कुटुंबही एकत्र आलं. डोळ्यांत पाणी आणून थरथरत्या आवाजात तिचे वडील म्हणाले, “वेल, ही नीड्स लाइफ, अल्सो!”