Bitcoin : एखाद्या व्यक्तीकडे बेसुमार संपत्ती असेल आणि त्याला त्याची कल्पनाही नसेल तर यापेक्षा वाईट नशीब काय असू शकतं. अशीच एक घटना ब्रिटनमधून समोर आली आहे. इथे 9 वर्षाआधी एका व्यक्तीने कॉम्प्युटरची हार्ड डिस्क कचऱ्यात फेकली होती. रिपोर्टनुसार, या डिस्कमध्ये 8 हजार बिटक्वाइन सेव्ह होते.
दक्षिण वेल्सच्या न्यू पोर्टला राहणाऱ्या जेम्स हॉवेल्सने 2013 मध्ये एका हार्ड डिस्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकली होती. पण आता 9 वर्ष गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की, जी हार्ड डिस्क त्याने बेकार समजून फेकली होती, ती त्याचं नशीब चमकवणारी होती. कारण त्या हार्ड डिस्कमध्ये 8 हजार बिटक्वाइन सेव्ह होते. सध्या त्या 8 हजार बिटक्वाइनची किंमत 1446 कोटी रूपये इतकी होते.
बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, हॉवेलकडे लॅपटॉपच्या दोन हार्ड डिस्क होत्या. यातील एक रिकामी होती. तर दुसऱ्यात बिटक्वाइन सेव्ह होते. हार्ड डिस्कमध्ये सेव्ह बिटक्वाइनची मायनिंग त्याने 2009 मध्ये केली होती.
जेव्हा त्याच्या लक्षात आलं की, चुकून त्याने सर्वात किंमती क्रिप्टोकरन्सी बिटक्वाइन सेव्ह असलेली हार्ड डिस्क फेकली तर त्याला धक्का बसला. आता त्याने ती शोधण्यासाठी मास्टर प्लान तयार केला.
जेम्स हॉवेल हरवलेली हार्ड डिस्क शोधण्यासाठी एक मास्टर प्लान तयार केला आहे. तोही फार खर्चीक आहे. या प्लाननुसार 11 मिलियन डॉलर म्हणजे 87 कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च येईल. हॉवेल हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर करून हरवलेली हार्ड डिस्क मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा प्लान आहे की, डंपयार्डमध्ये असलेल्या साधारण 110, 000 टन कचऱ्यात हार्ड डिस्क शोधायची. यासाठी त्याने एक टीम तयार केली आहे. ज्यात दोन रोबोटिक डॉगही आहेत.
साधारण 10 वर्षांनंतर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हलवलेली हार्ड डिस्क शोधणं फार अवघड काम नक्कीच आहे. पण माजी आयटी कर्मचारी हॉवेलला पूर्ण विश्वास आहे. पण त्याची डंपयार्डमध्ये हार्ड डिस्क शोधण्याची मागणी नगर परिषदने फेटाळून लावली आहे. ते म्हणाले की, हे खर्चीक आणि पर्यावरणासाठी नुकसानकारक असेल.