लंडन : भाजपला वाटतेय की भारतात ते कायम सत्तेत असतील; पण परिस्थिती तशी नाही. गरज पडल्यास विरोधी पक्ष एकत्र येऊन भारतातील लोकशाही संस्थांच्या सुधारण्याचे काम हाती घेतील, असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी येथे व्यक्त केले.
आपल्या लंडन दौऱ्याचा समारोप करताना छतम हाउस थिंक टँकशी संवाद साधताना ते बोलत होते. आपल्या मोबाइलमध्ये पेगासस या इस्रायली सॉफ्टवेअरची घुसखाेरी केल्याच्या आरोपाचाही त्यांनी पुनरुच्चार केला. भाजप विरोधकांचा आवाज दाबू पाहत असल्याचेही ते म्हणाले. लोकशाही संस्थांचे दमन खूप धोकादायक आहे. परदेशी मीडियातही भारतातील लोकशाहीबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
भारतात झपाट्याने काही बदल होत असून त्याचा अंदाज काँग्रेस आणि यूपीए सरकारला आला नाही. काँग्रेसने नेहमीच ग्रामीण विकासाकडे लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, ग्रामीण ते शहरी अशा झालेल्या बदलाचा अंदाज काँग्रेसला आला नाही, अशी कबुलीही त्यांनी दिली. दरम्यान, भारतातील लोकशाहीविषयी राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यांचा भाजपने मंगळवारी निषेध केला आहे.
भाजप नेते रवी शंकर प्रसाद यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ब्रिटिश संसदेसारख्या व्यासपीठाचा भारताबद्दल खोटेनाटे पसरविण्यासाठी वापर केल्याबद्दल राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
- आरएसएस ही मूलतत्त्ववादी आणि हुकुमशाही संस्था असल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. त्यांनी सर्व लोकशाही संस्थांवर ताबा मिळविल्याचेही ते म्हणाले.
- मीडिया, न्यायपालिका, संसद, निवडणूक आयोग अशा सर्वच संस्थांवर त्यांनी ताबा मिळवला असून त्यांचे यातील सातत्य आश्चर्यचकित करते, असे ते म्हणाले.