खगोलशास्त्रज्ञांनी आकाशगंगेमध्ये एक असा तारा शोधला आहे. जो सूर्याच्या आकाराचा असून, सुमरे ५०० दशलक्ष प्रकाशवर्षे दूर आहे. या ताऱ्याला एक ब्लॅकहोल गिळंकृत करत आहे. या नाट्यमय घटनेमुळे दर २५ दिवसांनी प्रकाशाचा नियमित स्फोट उत्पन्न होत होता. ही घटना लिसेस्टर विद्यापीठाच्या संशोधकांनी पाहिली आहे.
सर्वसाधारणपणे, जेव्हा कुठलाही तारा ब्लॅकहोलमध्ये सामावला जातो तेव्हा ब्लॅकहोलचा विस्फोट होताना दिसतो. मात्र वारंवार प्रकाशाचं उत्सर्जन होत असेल तर त्याचा अर्थ तारा अंशत: नष्ट होत आहे, असा होतो. संशोधकांच्या मते ज्या घटनांमध्ये वारंवार विस्फोट होतो, त्यामध्ये दोन प्रकार असतात. पहिला म्हणजे जे दरवर्षी होतात. तर दुसरा ज्यात काही तासांमध्ये होतात.
लिसेस्टर विद्यापिठाच्या संशोधकांच्या पथकाने सांगितले की, तारा वारंवार तुटण्याच्या प्रक्रियेमध्ये, प्रकाश उत्सर्जनाची घटना २५ दिवसांमध्ये एकदा होत होती. या ताऱ्याला स्विफ्ट J0230 असं नाव देण्यात आलं होतं. तो अपेक्षेप्रमाणे घट होण्याऐवजी ७ ते १० दिवसांसाठी चमकणं सुरू करत होता. नंतर अचानक चमकणं बंद व्हायचा. या प्रक्रियेदी दर २५ दिवसांनी पुनरावृत्ती होत होती.
संशोधकांनी सांगितले की, नेचर अँस्ट्रोनॉमी नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या कामाने भ्रमण करणारे तारे ब्लॅकहोलमुळे कसे बाधित होतात, हे सर्वांना दाखवून दिले आहे. डॉ. रॉबर्ट आइल्स-फेरिस यांनी सांगितले की, भूतकाळात आम्ही ज्या प्रणाली पाहिल्या आहेत, त्यामधील बहुतांशांमध्ये तारा पूर्णपणे नष्ट झाला होता. मात्र स्विफ्ट J0230 अंशत: नष्ट होत आहे. ही एक रोमांचक घटना आहे.