नवी दिल्ली : भारतीयांनी परदेशात जमा केलेला काळा पैसा परत आणण्याच्या कामाला लागलेले विशेष तपास पथक (एसआयटी) भारताने स्वीत्झर्लंड आणि अन्य देशांशी केलेल्या कर समझोत्यातील गोपनीयतेच्या वादग्रस्त मुद्यांची पडताळणी करणार आहे. भारताने अनेक देशांसोबत कर माहिती देवाण-घेवाण समझोता केला आहे. या समझोत्यामध्ये एक ‘गोपनीयता’चा करार आहे. या करारामुळे अन्य कर अंमलबजावणी व तपास संस्थांना माहिती प्राप्त करण्यास बाधा निर्माण होते. काळ्या पैशांच्या अर्ध्या डझनहून अधिक प्रकरणात आयकर विभाग किंवा संबंधित एजन्सींकडून मिळालेल्या माहितीचा उपयोग कसा करावा, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश एम.बी. शहा यांच्या अध्यक्षतेखालील एसआयटी विचार करीत आहे; कारण ही माहिती अन्य तपास संस्थांना दिली जाऊ शकत नाही. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड आणि आयकर विभाग यांच्याकडून मिळालेली माहिती अन्य एजन्सींना देता यावी म्हणून एसआयटी परदेशातील सक्षम न्यायालय आणि संबंधित प्राधिकरणांकडून परवानगी घेण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)
काळा पैसा : एसआयटी लागली कामाला
By admin | Published: June 09, 2014 4:24 AM