वॉशिंग्टन : अमेरिकेच्या बाल्टीमोर शहरात एका कृष्णवर्णीय तरुणाच्या पोलीस कोठडीतील मृत्यूप्रकरणी सहा पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हेगारी खटला चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २५ वर्षांच्या कृष्णवर्णीय तरुणाला करण्यात आलेली अटक बेकायदा होती आणि त्याच्या मृत्यूस खून मानून खटला चालविण्यात येईल, असे सरकारी वकील मर्लीन मोसबी यांनी सांगितले. कृष्णवर्णियाच्या मृत्यूनंतर शहरात निदर्शने करीत असलेल्या नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.फ्रेडी ग्रे या कृष्णवर्णीय तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. मज्जारज्जूला घातक इजा झाल्यामुळे फ्रेडीचा मृत्यू झाल्याचे तपासणीत समोर आले होते. ग्रे याच्या मृत्यूनंतर शहरात हिंसक निदर्शने सुरू झाली होती. जाळपोळ, लुटालूट आणि पोलिसांशी चकमकीचे प्रकारही घडले होते. ग्रे याला अटक करणाऱ्या सहा पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. या सहा जणांपैकी पोलीस व्हॅनचा चालक सीजर गुडसन याच्यावर सर्वाधिक गंभीर आरोप आहेत. हे आरोप सिद्ध झाल्यास त्याला ३० वर्षांचा कारावास होऊ शकतो. इतर पोलिसांवर सदोष मनुष्यवध, हल्ला आणि कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप आहे.