बीजिंग - चीनमधील एका केमिकल प्लांटमध्ये बुधवारी (28 नोव्हेंबर) भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटात 22 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. उत्तर चीनमधील झांगजियाको शहरात हा भीषण स्फोट झाला.
स्फोटाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या काही गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत 38 ट्रक आणि 12 वाहनं जळून खाक झाली आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
चीन राजधानी बीजिंगपासून जवळपास 200 किलोमीटर अंतरावर हा स्फोट झाला. 22 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चीनमधील या स्फोटाचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. तसेच याचा अधिक तपास केला जात आहे.