ऑनलाइन लोकमत
ब्रसेल्स, दि. २५ - तीन दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ल्याने हादरलेल्या बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये पुन्हा एकदा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. ब्रसेल्सच्या स्चारबीक जिल्ह्यामधील एका घरात शोध मोहिम सुरु असताना स्फोटाचा मोठा आवाज झाल्याचे वृत्त बेल्गा न्यूज एजन्सीने दिले आहे.
एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, सुरक्षापथकांनी एका व्यक्तीला अटक केली आहे पण तपास अधिका-यांनी यासंबंधी अधिकृतरित्या काहीही सांगितलेले नाही असे आरटीबीफ वृत्तवाहिनीने सांगितले. ब्रसेल्समध्ये मंगळवारी अतिरेक्यांनी विमानतळावर दोन आणि मेट्रो स्थानकात एक असे तीन स्फोट घडवून आणले. या स्फोटामध्ये ३१ जण ठार झाले तर, ३१६ जण जखमी झाले.
या कटाच्या कारस्थानकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठया प्रमाणावर ब्रसेल्समध्ये शुक्रवारी शोधमोहिम सुरु असाताना हा स्फोट झाला. बेल्जियम प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार घटनास्थळी बॉम्ब निकामी पथक असून, पोलिसांनी संपूर्ण भागाला घेराव घातला असून प्रवेशबंद केला आहे.
मंगळवारी सकाळी तीन हल्लेखोर विमानतळावर येण्यासाठी जिथून निघाले तिथेच हे छापे मारण्यात आले. त्यांच्याकडे तीन सूटकेस बॉम्ब होते. त्यातील दोन बॉम्ब फुटले. मंगळवारी रात्री स्चारबीक शहरात छापेमारीची कारवाई सुरु असताना पोलिसांना १५ किलो स्फोटके आणि बॉम्ब बनवण्याची रसायने सापडली. त्यात इसिसचा झेंडाही होता.
या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक झाली आहे. इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, नोव्हेंबर महिन्यात पॅरिसवर झालेल्या हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेल्या सालाह अब्देस्लामला अटक झाल्यानंतर चारच दिवसात हे बॉम्बस्फोट झाले.