ऑनलाइन लोकमत
काबूल, दि. ११ - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील स्पॅनिश दूतावासावर दहशतवादी हल्ला झाला असल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी संध्याकाळी गर्दीच्यावेळी शेरपूर भागात एका कारमध्ये बॉम्बस्फोट झाला. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार स्पॅनिश दूतावासाजवळ असणारे एक अतिथीगृह दहशतवाद्यांचे लक्ष्य आहे. या अतिथिगृहात परदेशी नागरीकांची सतत ये-जा सुरु असते.
शेरपूर भागात अनेक एनजीओची कार्यालये असून, वरिष्ठ सरकारी अधिका-यांची निवासस्थाने सुध्दा या भागात आहेत. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे अफगाणी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
स्पॅनिश दूतावासाजवळ गोळीबाराचे आवाज येत असून, सुरक्षापथकांनी या भागाला घेराव घातला आहे. याच आठवडयात तालिबानी दहशतवाद्यांनी कंदहार विमानतळावर हल्ला केला होता. यात महिला आणि लहान मुलांसह ५० जण ठार झाले होते.